भोर-महाड रस्त्यावरील पुलाला चक्क बांबूंचा आधार | पुढारी

भोर-महाड रस्त्यावरील पुलाला चक्क बांबूंचा आधार

भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर-महाड रस्त्यावर असलेल्या नीरा नदीवरील आंबेघर येथील पुलाचे कठडे तुटले आहेत. भेगा पडून त्यावर झाडे उगवली आहेत. त्यामुळे पूल धोकादायक अवस्थेत असताना संबंधित विभागाने गुरुवारी (दि. 27) पुलाला चक्क बांबूचा आधार देत पूल सुरक्षित असल्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. भोर-महाड मार्ग हा कोकणात जाणारा नजीकचा मार्ग आहे. या मार्गावर कायम वाहनांची मोठी वर्दळ असते. महाड औद्योगिक वसाहतीकडे याच मार्गावरून वाहने जातात. याच मार्गावरील आंबेघर येथे निरा नदीवर असलेल्या पुलाने नीरा देवघर धरण, रिंग रोड, महाड रस्त्यावरील गावे, तसेच शिळिंब, म्हसर खोरे येथील गावांना जोडले आहे.

सध्या या पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाचे कठडे तुटले असून, तो वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या धोकादायक ठिकाणी लोखंडी ग्रील बसवणे गरजेचे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने चक्क बांबू बांधून पूल सुरक्षित केल्याचा अजब कारभार केला आहे. भोर-महाड रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून खर्च केले जातात. मात्र, काही ठिकाणी अजूनही रस्ता दुरुस्तीची कामे रखडली आहेत. सध्या अतिवृष्टीमुळे वरंधा घाटातील रस्ता खराब झाला आहे. तरीही या मार्गावर रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून नागरिक आंबेघर येथील निरा नदीवरील पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करत आहेत; परंतु तात्पुरत्या स्वरूपात बांबू व सुरक्षित पट्टी बांधून नागरिकांची बोळवण केली आहे.

 

Back to top button