वृद्ध महिलेस लुटणार्‍यास अटक | पुढारी

वृद्ध महिलेस लुटणार्‍यास अटक

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेस मारहाण करून लुटणार्‍यास इंदापूर पोलिसांनी अटक केली. दिलीप लक्ष्मण अंकुश (रा. सणसर, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. रुक्मिणी पांडुरंग करगळ (वय 80, रा. वनगळी, ता. इंदापूर) यांना गुरुवारी (दि. 27) दिवसाढवळ्या मारहाण करून लुटण्यात आले. त्यांच्या गळ्यातील आणि कानातील दागिने चोरट्याने हिसकावून नेले. त्यात त्या जखमी झाल्या. इंदापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेगाने तपास करत केवळ पाच तासांत आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करगळ या औषध खरेदीसाठी इंदापुरात आल्या होत्या. त्या पुन्हा घरी जात असताना जुना पुणे-सोलापूर महामार्गावरून एक अनोळखी हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना घरी सोडण्याचा बहाणा करून त्यांना दुचाकीवर बसविले. सोलापूर मार्गाने सरडेवाडी टोलनाक्याच्या दिशेने नेत त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील दागिने हिसकावून चोरट्याने पोबारा केला.
इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोधपथकाने सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज व तांत्रिक माहितीवरून आरोपीस अटक केली. त्याच्याकडून दागिने, रोख रक्कम तसेच दुचाकी हस्तगत केली. सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, योगेश लंगुटे, प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, सलमान खान, नंदू जाधव, गणेश डेरे, मोहन आनंदगावकर, संग्राम माने, लखन झगडे यांनी केली.

Back to top button