मुळशी धरणात 72 टक्के पाणीसाठा | पुढारी

मुळशी धरणात 72 टक्के पाणीसाठा

पौड : पुढारी वृत्तसेवा :  मुळशी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मुळशी धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. 28) सकाळी सात वाजेपर्यंत धरणाचा पाणीसाठा 72 टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या आठ दिवसांपासून धरण परिसर क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. पावसामुळे धरणाचा साठा वाढत असल्याने पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची समस्या मिटणार आहे. मागील वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच मुळशी धरण शंभर टक्के भरून वाहू लागले होते.

या वर्षी पावसाला उशिराने सुरुवात झाली तसेच पावसाला जोर नसल्याने धरण भरण्यास उशीर लागत आहे. त्यामुळे मुळशी धरण शंभर टक्के होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मुळशी धरणाच्या पाण्याचा वापर भिरा या ठिकाणी वीजनिर्मिती करण्यासाठी होतो. तयार होणारी वीज मुंबई शहराला पुरविली जाते. मुळशी धरण शंभर टक्के भरण्याच्या अगोदरच धरणातून मुळा नदीत विसर्ग करण्यात येतो. धरणाचे पाणी मुळा-मुठा नदीमार्गे उजनी धरणात जाते. मुळशी धरण प्रशासनाने मुळशी धरण शंभर टक्के भरण्याची वाट न बघता धरण 85 ते 90 टक्के भरल्यानंतर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची गरज आहे; अन्यथा धरण शंभर टक्के भरल्यावर नदीत जादा पाणी सोडावे लागते. यामुळे मुळा नदीला पूर येऊन अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा फटका बसतो. तसेच अनेक ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागतो.

Back to top button