खेडच्या पर्यटन पंढरीत निसर्गाचा जलोत्सोव | पुढारी

खेडच्या पर्यटन पंढरीत निसर्गाचा जलोत्सोव

आदेश भोजने

वाडा : खेड तालुक्यातील पश्चिम भागातून सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात सुरू झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. यासोबतच ओढे, नाले, ओल्याचिंब झालेल्या डोंगररांगा, सह्याद्रीच्या पर्वत रांगामधून फेसळणारे पांढरे शुभ— धबधबे कोसळू लागल्याने जिल्ह्यातील खेड तालुक्याची पर्यटन पंढरी म्हणून ओळख असलेल्या पश्चिम भागात चासकमान धरण, कळमोडी धरण पाणलोट क्षेत्रात जलोत्सव सुरू झाला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात येळवली, भोरगिरी, कोथुरणे, टोकावडे, पाभे, भिवेगाव, भोमाळे, शिरगाव, मंदोशी, मोरोशी, डेहणे, नायफड, आव्हाट, वाडा परिसरात झालेल्या पावसाने वसुंधरा हिरवाईचा शालू नेसून बसली की काय, असा आभास अनुभवायला मिळत आहे. हिरवाईने नटलेली वसुंधरा पर्यटकांना भुरळ घालत आहे.

चासकमान धरणाला सुरुवात होताच परिसरातील निसर्गातील वैभव मन पल्लवित करून टाकते. जसजशी नजर पोहोचेल तसतसे निसर्गाचा सुखद अनुभव व जलोत्सोव दृष्टिक्षेपात येतो. परिसरातील वाडा येथील गडदुदेवी धबधबा, शिरगाव येथील नेकलेस धबधबा, कारकुडी येथील कारकुडी धबधबा, भोरगिरी परिसरातील अनेक छोटे-मोठे धबधबे, ओढे-नाले, बंधारे प्रवाहित झाल्याने परिसरात पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. धुक्यात हरवलेल्या डोंगररांगा, त्यापाठोपाठ येणारा थंडगार वारा अंगावर रोमांच आणतो. काही वेळातच धो धो कोसळणारा पाऊस उल्हास निर्माण करत आहे. या जलोत्सोवाचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

Back to top button