खड्ड्यांची वाट तुडवत होते भीमाशंकरचे दर्शन ; देवस्थानासह प्रशासनाकडूनदेखील अक्षम्य दुर्लक्ष

खड्ड्यांची वाट तुडवत होते भीमाशंकरचे दर्शन ; देवस्थानासह प्रशासनाकडूनदेखील अक्षम्य दुर्लक्ष

Published on

भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. येथे देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक श्रावण व महाशिवरात्रीला दर्शनाला येत असतात. येथे अभयारण्य असल्याने निसर्गप्रेमींचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. यातच तळेघर ते कोंढवळ फाटा येथील रस्ता खड्ड्यात गेला असून, वेडीवाकडी धोकादायक वळणे मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे भाविकांसह स्थानिकांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत, खड्ड्यांची वाट तुडवत भीमाशंकरचे दर्शन होत असल्याचे वास्तव यानिमित्ताने उघड झाले आहे.

तळेघर ते कोंढवळफाटा दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्याकडेला वेली, झाडी-झुडपी वाढली आहेत. वळणांवर झाडी-झुडपी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने वळण रस्ता समजून येत नाही. बेजबाबदार वाहनचालकमुळे अपघात होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर मूलभूत सुविधा पुरविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया भक्त, भाविक, पर्यटक, स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहे.

या वर्षी अधिक श्रावण व श्रावण असल्याने भक्त- भाविक, निसर्गप्रेमी व पर्यटक आपापल्या वाहनांमधून येत आहेत. इतर राज्यांतून येणा-या खासगी बस रस्त्याने सुसाट धावताना दिसतात. एस.टी. चालकांनी हा रस्ता आपल्या पायाखालचा असल्याच्या भ्रमात न राहता ताबा मिळवता येईल, असे वाहन चालविले पाहिजे. विशेषतः विरंगुळा म्हणून मौजमजा करण्यासाठी फिरायला येणारे पर्यटक मद्य पिऊन वाहन चालवताना दिसतात. मद्याच्या धुंदीत असलेले नवीन
वाहनचालक वाहने चालविताना दिसतात. यामुळे अपघातांमध्ये वाढ झााल्याचे दिसते. याचा नाहक त्रास येणार्‍या-जाणार्‍या भाविकांना होत आहे.

प्रशासन, देवस्थानचा दावा ठरला फुसका
श्रावण यात्रा 18 जुलै ते 14 सप्टेंबर चालणार असून, पहिल्याच दिवसापासून भक्त, भाविक व पर्यटक यांना खड्ड्यातून गचके खात प्रवास करावा लागला आहे. हे खड्डे त्वरित भरण्याची मागणी शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे यांनी केली आहे. एकीकडे प्रशासन व देवस्थान यात्रेकरिता सज्ज असल्याचा दावा करीत असले, तरी पहिल्याच सोमवारपासूनच ते यामध्ये अपयशी ठरल्याचा आरोप भाविक करीत आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news