पिंपरी : अजूनही 56 शाळांचा निकाल शून्य टक्केच | पुढारी

पिंपरी : अजूनही 56 शाळांचा निकाल शून्य टक्केच

गणेश विनोदे : 

वडगाव मावळ : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत मावळ तालुक्यात गेल्या दोन वर्षांत समाधानकारक वाढ होत असली तरी अजूनही जिल्हा परिषदेच्या 6 व खासगी 50 अशा एकूण 56 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला असल्याने ही शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

दोन वर्षांपूर्वी 65 शाळांचा निकाल शून्य टक्के
दोन वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील फक्त जिल्हा परिषद शाळेच्या तब्बल 65 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला होता. यासंदर्भात दैनिक पुढारीने वृत्तमालिका प्रसिद्ध करून तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा प्रताप प्रशासनाच्या व मावळवासीयांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने सतर्क होऊन गेली दोन वर्षे गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित केले आहे.

खासगी शाळांचा निकाल चिंताजनक
याचा परिणाम म्हणून गतवर्षी 55 तर यावर्षी 68 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याने शैक्षणिक गुणवत्ता सुधारत असल्याचे दिसते. तसेच, दोन वर्षांपूर्वी शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये कमालीची घट होऊन गतवर्षी फक्त 11 जिल्हा परिषद शाळांचा निकाल शून्य टक्के होता. परंतु, तब्बल 60 खासगी शाळा शून्य टक्के असल्याने गतवर्षीची शून्य टक्के शाळांची संख्या 71 होती.

गुणवत्तेच्या दृष्टीने गंभीर बाब
यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले जिल्हा परिषद शाळेचे 35 व खासगी शाळांचे 64 तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले जिल्हा परिषद शाळेचे 27 व खासगी शाळांचे 508 असे सर्वच्या सर्व 634 विद्यार्थी नापास झाले आहेत. गुणवत्ता यादीत येणे लांबच उलट एकही विद्यार्थी पास होऊ शकला नाही ही गुणवत्तेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.

त्या शाळांवर काय कारवाई होणार?
गेल्या दोन वर्षांत शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांना गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी नोटीस बजावून अहवाल मागविला होता. तसेच, शून्य टक्के निकाल लागल्यास संबंधित शाळेत जाऊन तेथील शिक्षकांचा शून्य टक्के निकाल लागल्याबद्दल सत्कार करण्याचा इशाराही दिला होता. यावर्षी ही जवळपास तीच परिस्थिती आहे. त्यामुळे शून्य टक्के निकाल लागलेल्या त्या शाळांवर काय कारवाई होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शून्य टक्क्यात अडकलेल्या शाळांची स्थिती चिंताजनक

यावर्षी शून्य टक्के निकाल असलेल्या शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळांची संख्या फक्त 6 असून 50 खासगी शाळांचा समावेश असल्याने अजूनही तालुक्यातील 56 शाळा या शून्य टक्क्यावरच आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत येण्याची संख्या वाढत आहे. तसेच, शिष्यवृत्ती परीक्षेत पास होण्याचे प्रमाणही वाढत आहे. परंतु, अशा स्थितीत अजूनही तब्बल 56 शाळा शून्य टक्क्यातच अडकल्या आहेत ही बाब चिंताजनक आहे.

Back to top button