डासोत्पत्ती ठिकाणांची पिंपरी चिंचवड पालिकेकडून शोधमोहीम | पुढारी

डासोत्पत्ती ठिकाणांची पिंपरी चिंचवड पालिकेकडून शोधमोहीम

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शोधमोहीम तीव्र  करून डेंग्यू आजार नियंत्रित करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा. वारंवार सूचना देऊनही डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या आस्थापना, बांधकाम साईट, हाउसिंग सोसायट्या, दुकाने व घरांची तपासणी करून अशी ठिकाणे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करा. कारवाईची मोहीम तीव— करा, असे आदेश महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आरोग्य विभागास दिले आहेत.

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनेबाबत पालिका भवनात आयुक्त सिंह यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, यशवंतराव चव्हाण स्मृती (वासीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त म्हणाले की, डेंग्यू नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. डासांची उत्पत्ती होणारी स्थळे प्राधान्याने नष्ट करा. अधिक पथके नेमून डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करून डासोत्पत्ती करणार्‍या ठिकाणांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव— करा. पथकांमध्ये आवश्यक मनुष्यबळ वाढवून शहरातील औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, हाउसिंग सोसायटी, घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह विविध भागांची नियमितपणे तपासणी करा. जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. हाउसिंग सोसायट्यांच्या प्रतिनिधींसमवेत प्रभागस्तरावर बैठक घेऊन माहिती द्या.

सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, पालिकेच्या वतीने कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी मॉस्क्युटो अबेटमेंट समितीची स्थापना आरोग्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी औषध फवारणी, औष्णिक धुरीकरण व कंटेनर सर्वेक्षण आरोग्य विभागातील कर्मचारी व वैद्यकीय विभागाकडील एमपीडब्ल्यू कर्मचारी यांच्या समन्वयाने केले जात आहे.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले की, शहरात डेंग्यू आजाराचे 27 संशयित रुग्ण आढळले आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या आठ रुग्णालयांच्या प्रमुखांमार्फत दररोज खासगी रुग्णालयांतील रुग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे.

रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील 200 घरात पर्यवेक्षण तसेच, परिसरात औषध फवारणी, औष्णिक धुरीकरण, कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालय व दवाखान्यांमध्ये डेंगीच्या तपासणीसाठी आवश्यक रॅपिड कीट उपलब्ध करून देण्यात आले असून, वायवीएम रुग्णालय येथे निश्चित निदान करण्यासाठी सेंटीनल सर्वेक्षण सेंटर कार्यरत आहे. शहरात अद्याप डोळे येण्याची साथ पसरली नसली तरी वैद्यकीय विभागाने इतर विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना डोळ्याच्या आजाराबाबत माहिती द्या
शहरालगतच्या आळंदी, चर्‍होली खुर्द आणि केडगाव अशा काही गावांमध्ये डोळे येण्याची साथ पसरली आहे. संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या अनुषंगाने पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना या आजाराचा संसर्ग होऊ नये, यासाठी तात्काळ उपाययोजना करा. विशेष पथक तयार करून आरोग्य तपासणी मोहीम राबवा. विद्यार्थी तसेच पालकांना आजाराविषयी माहिती देऊन कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.

 

Back to top button