क्रीडामंत्र्यांना गुणांसाठी ‘साकडे’ ; शालेय खेळ-क्रीडा बचाव समितीच्या वतीने निवेदन | पुढारी

क्रीडामंत्र्यांना गुणांसाठी ‘साकडे’ ; शालेय खेळ-क्रीडा बचाव समितीच्या वतीने निवेदन

सुनील जगताप :

पुणे : क्रीडा व युवक सेवा संचालनालनाच्या वतीने 49 क्रीडाप्रकारांना अनुदान तसेच गुणांकनाचा फायदा मिळत आहे. मात्र, 44 क्रीडा प्रकारांच्या शालेय स्पर्धा विनाअनुदान व विनागुणांकन तत्त्वावर सुरू आहेत. शासनाच्या वतीने यामध्ये गांभीर्याने विचार करुन 44 क्रीडा प्रकारांना गुणांकन देण्यात यावे, असे साकडे शालेय खेळ-क्रीडा बचाव समितीच्या वतीने नवनियुक्त क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना घालण्यात आले आहे. 2013 मध्ये तत्कालीन क्रीडामंत्री व आयुक्त यांच्या मान्यतेने 44 क्रीडाप्रकारांना विनाअनुदान व विनागुणांकन तत्त्वावर शालेय क्रीडा स्पर्धेत समावेशन करून घेतले व कालांतराने क्रीडा गुण देण्याचे आश्वासन देण्यात आले. शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करून सर्व क्रीडा संघटनांनी तांत्रिक व आर्थिक जबाबदारी पार पाडून संपूर्ण राज्यात व सर्व जिल्ह्यांमध्ये शालेय स्पर्धा आयोजित केल्या. आयोजित केलेल्या स्पर्धांचा अहवाल जिल्ह्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आयुक्त, क्रीडा व युवक कल्याण संचालनालय यांच्या कार्यालयात दरवर्षी जमा करण्यात येतो.

दरम्यान, या क्रीडा प्रकारांना गुणांकन मिळावे यासाठी शालेय खेळ क्रीडा बचाव समितीबरोबरच प्रशिक्षक आणि खेळाडूही प्रयत्न करीत आहेत. त्यासदंर्भातील शासनाकडून मागविण्यात आलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे शासनालाही सादर करण्यात आलेली आहेत. 8 जून 2023 रोजी क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी या क्रीडा प्रकारांना क्रीडा गुण मिळावेत याकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव यांना शिफारस केली आहे. गेल्या दहा वर्षापासून शासनाच्या अटी व नियमांचे पालन तसेच वारंवार मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करूनही आजतागायत क्रीडा प्रकारांना क्रीडा गुण सवलत मिळालेली नाही. क्रीडामंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून खेळाडूंना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण होणेकरिता शासनाच्या वतीने आयोजित होणार्‍या शालेय क्रीडा स्पर्धेच्या प्रमाणपत्रास क्रीडा गुण सवलत मिळावी तसेच सर्व वयोगटातील युवकांना स्पर्धेत सहभाग होण्याकरिता वयोगट 14, 17, 19 या गटाचा प्राधान्याने विचारही व्हावा.
                             श्याम भोसले, अध्यक्ष, शालेय खेळ-क्रीडा बचाव समिती

Back to top button