उजनी पाणलोट क्षेत्रात शृंगी घुबडाचा वावर

उजनी पाणलोट क्षेत्रात शृंगी घुबडाचा वावर

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा :  अपशकुनी पक्षी म्हणून ओळख असलेल्या; परंतु शेतकर्‍यांना उपयुक्त असलेल्या घुबडांची संख्या आजकाल रोडावत असताना उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जुन्या झाडी व इमारतींच्या आश्रयात अधूनमधून घुबड पक्षिनिरीक्षकांना दर्शन देतात. पक्षिमित्र उमेश सल्ले व वन्यजीव छायाचित्रकार ऋतुराज यांना नुकतेच इंदापूर तालुक्यातील पळसदेव व कुंभारगाव परिसरात धरणाच्या काठावरील जुन्या वृक्षांच्या आश्रयात शृंगी घुबड आढळून आले. उजनी पूर्णपणे रिते झाल्यामुळे धरणाच्या पोटात समाधी घेतलेली जुनी मंदिरे, इमारती उघड्या पडल्या आहेत. या ठिकाणी ही घुबडे फेरफटका मारताना पक्षिनिरीक्षकांना नजरेस पडत आहेत.

बुबो बुबो  : बुबो बेंगालेन्सिसअसे शास्त्रीय नाव असलेला शृंगी घुबड नेहमी डोंगरांच्या कड्याकपारी, जुन्या इमारती, मोठे वृक्ष, ढासळलेली बुरुजे, वखार-गोदामे व स्मशानभूमी या ठिकाणी आढळतो. एरवी एकेकटे वावरणारे शृंगी घुबड विणीच्या काळात जोडीने राहतात. यांच्यातील वीणकाळ फेब—ुवारी ते एप्रिल महिन्यात असतो. या पक्ष्यांचे आयुष्य 12 ते 15 वर्षे असते. त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूस पिसांचे दोन झुपके असतात. ते शिंगांसारखे दिसत असल्यामुळे त्याला शृंगी घुबड असे म्हणतात. जादूटोणा, भानामती विद्येत घुबडाचा वापर करतात; त्यामुळे घुबडांची शिकार होत असते. वर्षातून तीन चार पिल्लांना जन्म घालण्याची क्षमता असलेल्या शृंगी घुबडाची एक जोडी एका रात्रीत सुमारे 20 ते 30 उंदीर व घुशींना कंठस्नान देते. शेतकर्‍याच्या पिकाला माणसाच्या मालमत्तेला हानी पोहचविणार्‍या उंदीर-घुशींचा कर्दनकाळ ठरलेल्या घुबडांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

शृंगी घुबडाची वैशिष्ट्ये
शरीरावर तपकिरी करड्या रंगाची तलम पिसे असतात.
डोळे मोठे, गोलाकार, शेंदरी-पिवळसर असतात. डोळ्यांभोवती तबकडीसारखे गोलाकार वलय असते. मोठ्या डोळ्यांमुळे व डोळ्यांतील पेशींच्या विशिष्ट रचनेमुळे ते रात्रीसुद्धा पाहू शकतात.
डोके जरा मोठे व मान आखूड असते. ते डोळे हलवू शकत नाहीत, मात्र आजूबाजूला पाहण्याकरिता आपली पूर्ण मान फिरवू शकतात.
पाय आखूड, मजबूत व पिसांनी झाकलेले असतात. बोटांना तीक्ष्ण, बळकट व वाकडी नखे असतात.

चोच हिरवट रंगाची व वक्राकार असून, तिच्या टोकाशी धारधार आकडी असते.
चेहरा समोरून दाबल्यामुळे तो पसरट असून, समोरून पाहिल्यावर तो मानवी चेहर्‍यासारखा दिसतो.

घुबड नामशेष होण्याच्या मार्गावर
रॉक ईगल आउल, इंडियन ईगल आउल व बेंगाल ईगल आउल  अशी इंग्रजीत नावे असलेला शृंगी घुबड एकेकाळी सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. मात्र, माणसातील बदलती जीवनशैली व त्यांच्या अधिवासात घुसखोरी आदी कारणांमुळे घुबड नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

गैरसमज :
घुबडाचे तोंड पाहिल्यास दिवस वाईट जातो.
घुबडाकडे दगड भिरकावला तर घुबड तो दगड घोळवत बसतो. दगड घोळवताना जसजसा दगड झिजेल तसा दगड भिरकावणार्‍याचे शरीर झिजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news