धक्कादायक ! बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले योजनाच नाही | पुढारी

धक्कादायक ! बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले योजनाच नाही

प्रज्ञा केळकर-सिंग : 
पुणे : शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा वाढविण्याची घोषणा केली खरी; मात्र पुण्यातील बहुतांश मोठ्या रुग्णालयांमध्ये योजनाच उपलब्ध नाही.  गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयांमधील उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे. शासन सर्व मोठ्या रुग्णालयांना योजनेमध्ये सामावून का घेत नाही? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
आजारपणासाठी होणारा खर्च 
सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. महागडे उपचार, भरमसाट बिले, यामुळे अक्षरश: नाकीनऊ येते. यंदाच्या अर्थसंकल्पात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रतिकुटुंब मर्यादा दीड लाखावरून पाच लाखांपर्यंत नेण्यात आली. तसेच, रुग्णालयांची संख्याही वाढविणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, याबाबतचा शासन निर्णय अद्याप प्रलंबित आहे. पुणे जिल्ह्यातील 67 रुग्णालयांमध्ये योजना उपलब्ध आहे. त्यामध्ये शहरातील केवळ  नऊ ते दहा खासगी रुग्णालयांचाच समावेश आहे. एकीकडे खासगी रुग्णालयांचे जाळे
वाढत असताना तिथे सामान्यांना शासकीय योजनेंतर्गत उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी आणि खासगीमधील महागडे उपचार, या कात्रीत गरजूंनी जायचे कुठे?
असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोणाला मिळतो लाभ..?
राज्य शासनाची महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य या दोन्ही योजना एकत्रितपणे राबविल्या जात आहेत. पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे या योजनेस पात्र आहेत. आधार कार्ड किंवा कोणतेही एक ओळखपत्र हवे असते. रेशन कार्ड नसल्यास पेशंटने महाराष्ट्रातील रहिवासी पुरावा द्यावा.
कोणत्या खासगी  रुग्णालयांमध्ये लाभ?
भारती हॉस्पिटल, कात्रज
केअर मल्टिस्पेशालिटी, वाघोली
देवयानी मल्टिस्पेशालिटी, कोथरूड
मोरया मल्टिस्पेशालिटी, सिंहगड रस्ता
पवार मल्टिस्पेशालिटी, कात्रज
एचव्ही देसाई आय हॉस्पिटल, हडपसर
रायझिंग मेडिकेअर, येरवडा
श्री हॉस्पिटल, खराडी
नवले हॉस्पिटल, नर्‍हे
सूर्या सह्याद्री, कसबा पेठ
महात्मा फुले योजनेचे लाभार्थी
1 मार्च 2021 ते 31 मार्च 2022  : 43 हजार 783
1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 : 39 हजार 211
1 एप्रिल 2023 ते आजपर्यंत : 15 हजार 4
कागदपत्रांसाठी धावपळ 
एकीकडे रुग्ण अ‍ॅडमिट असताना नातेवाइकांना कागदपत्रांच्या जमवाजमवीसाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे उपचारांना विलंब होतो. कागदपत्रे जमविल्यावर रुग्णाचा आजार योजनेत बसत नसल्याचे सांगितले जाते, अशी रुग्णांची तक्रार आहे.
जिल्ह्यातील 67 रुग्णालयांचा योजनेंतर्गत समावेश आहे. योजना लागू करण्याबाबत रुग्णालयांना सक्ती करता येत नाही. रुग्णालयांनी आपणहून अर्ज केल्यास पाहणी, तपासणी केली जाते अणि त्यानुसार निर्णय घेतला जातो. राज्यामध्ये 
1000 रुग्णालयांचा योजनेत समावेश केला जाऊ शकतो.
                                                                – डॉ. वैभव गायकवाड, जिल्हा समन्वयक, पुणे
सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आमच्या पुणे आणि नाशिक या दोन रुग्णालयांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सेवा देत आहोत. आपल्या समाजाला सर्वसमावेशक आरोग्यसेवा देण्याप्रती आमची निष्ठा कायम राखत आमच्या रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठी सदैव वचनबद्ध आहोत.
                                               – अब्रारअली दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, सह्याद्री हॉस्पिटल्स

Back to top button