

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात महायुतीचे 45 पेक्षा अधिक खासदार निवडून येतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. महायुतीचे तिन्ही नेते भक्कम असून, त्यांच्यात अंतर्गत स्पर्धा नाही. महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या मागे भाजप व युतीतील अन्य पक्ष उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपतर्फे लोकसभा प्रवास योजनेंतर्गत लोकसभेच्या 48 मतदारसंघांत बैठका घेण्यात येत आहेत. रायगड, बारामती, शिरूर आणि शिर्डी यांच्यासह हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सातारा या लोकसभा मतदारसंघांचा आढावा आज पुण्यातील बैठकीत घेण्यात आला. मुंबईत काल चार मतदारसंघांचा आढावा घेतला.
बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही सर्व विचार करूनच महायुतीत आले आहेत. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगला समन्वय आहे. महायुती कमजोर होणार नाही, यासाठी तिन्ही पक्ष काळजी घेत आहेत. जागा वाटपाचा निर्णय केंद्रीय पातळीवर होईल. तिन्ही पक्षांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली, तरी त्यांच्यामागे भाजपसह महायुती ठामपणे उभे राहील. बारामतीत महायुतीचाच खासदार निवडून येईल. त्यासाठी तिन्ही पक्षांतील प्रत्येकी चार नेते, अशा बारा जणांची समन्वय समिती नेमली आहे. त्याच पद्धतीने जिल्हा व तालुकापातळीवर समित्या नियुक्त केल्या जातील.
काँग्रेस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, काँग्रेसला विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडता आला नाही. त्यांच्यात अंतर्गत असंतोष आहे. ठाकरे यांनी नागपूरमध्ये फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका केली. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ठाकरे यांची अवस्था मनोरुग्णासारखी झाली आहे. ते अशीच टीका करीत राहिले, तर आम्हीही त्याच भाषेत उत्तर देऊ. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी टोलनाक्याबाबत तक्रार केली असती, तर तो प्रश्न सरकार सोडवेल. महाराष्ट्र सरकारकडे मनसेचे नेते राज ठाकरे यांना महत्त्व आहे. त्यांचे म्हणणे ऐकले जाईल.
नेते भेटले, राजकीय चर्चा नाही
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मंगळवारी पुण्यात झाली. मात्र, त्यांच्यात राजकीय चर्चा झाली नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. शहा, नड्डा हे राजकीय कारणासाठी आले नव्हते. त्यामुळे त्याबाबत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :