4 हजार 718 शिक्षकांची यूडायसवर दुबार नोंदणी | पुढारी

4 हजार 718 शिक्षकांची यूडायसवर दुबार नोंदणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 4 हजार 718 शिक्षकांची यूडायस प्रणालीवर दुबार नोंदणी असल्याचे समोर आले आहे. दुबार नोंदणी असलेल्या शिक्षकांची माहिती तपासून यूडायस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरतीबाबत चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात डॉ. प्रज्ञा सातव, अशोक जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड, डॉ. वजाहत मिर्झा, जयंत आसगावकर, सतेज पाटील, धीरज लिंगाडे, सुधाकर अडबाले, किशोर दराडे यांनी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तरे दिली.

राज्यात 2022-23 पासून सर्व शाळा, विद्यार्थी, शिक्षकांची आधार वैधतेसह यूडायस प्लस प्रणालीत भरण्याची कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत सुरू आहे. त्यानुसार राज्यात 12 हजार 653 शिक्षकांची दुबार नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात माहिती तपासून अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सद्य:स्थितीत 4 हजार 718 शिक्षकांची यूडायस प्रणालीवर दुबार नोंदणी असल्याचे दिसून आले. दुबार नोंदणी असलेल्या शिक्षकांची माहिती तपासून यूडायस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे केसरकर यांनी नमूद केले.

पुणे जिल्ह्यातील 1 हजार 403 बोगस शिक्षकांबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तसेच स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याच्या सूचना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या अनियमित मान्यतेच्या अनुषंगाने संबंधितांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा :

Kolhapur Rain | राधानगरी धरणाचा ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला

कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला आज रेड अलर्ट

Back to top button