

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत 17.21 टीएमसी म्हणजे 59.03 टक्के पाणीसाठा असून, हे पाणी पुणेकरांना पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढे आहे, असे असतानाही शहराची पाणीकपात सुरूच ठेवण्यात आल्याने टँकरधारकांकडून नागरिकांची लूट केली जात आहे. दरम्यान, 1 ऑगस्टनंतर धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीकपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.
शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणसाखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस पडला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर, गेल्या काही दिवसांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांतील एकूण पाणीसाठा हा सात टीएमसीने वाढला आहे. आजपर्यंत खडवासला धरणसाखळीतील एकूण पाणीसाठा हा 17.21 टीएमसी इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो कमी आहे. गेल्या वर्षी 20.48 टीएमसी इतका पाणीसाठा होता. पाऊस वाढल्यास धरणांतील साठा वाढू शकतो. सध्या खडकवासला धरणसाखळीत पुणेकरांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा आहे.
पाणीकपात सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर दुसर्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत होणार्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. या टँकरसाठी नागरिकांना जास्त रक्कम मोजावी लागत आहे. महापालिकेचे सुमारे साडेपाचशे टँकर असून, खासगी दोनशे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
पुणे शहरासाठी खडकवासला धरणसाखळीतून 11.60 टीएमसी, समाविष्ट गावांसाठी 1.75 टीएमसी, भामाआसखेड धरणातून 2.67 टीएमसी आणि पवना धरणातून 0.36 टीएमसी पाणीसाठी घेते. या मंजूर कोट्याव्यतिरिक्त पालिका खडकवासला धरणसाखळीतून जादा पाणी उचलते. मंजूर कोटा आणि अतिरिक्त असा एकूण 16 टीएमसी पाणी पुणे शहराला खडकवासला धरणसाखळीतून घेते. या चारही धरणांत एकूण 17.21 टीएमसी पाणीसाठा आहे.
पुणेकर धो-धो पडणार्या पावसाला गमतीने म्हणत 'तुला पडायचेच असेल तर धरणात पड बाबा; पण शहरात इतका बरसू नको.' आज वरुणराजाने चक्क पुणेकरांचे ऐकले असे म्हणावे लागेल. कारण, धरणक्षेत्रात धो-धो, तर शहरात रिमझिम पाऊस बरसत आहे. गेल्या आठ तासांत धरणांत 100 मिलिमीटर एवढा पाऊस झाला, तर शहरात अवघा 1 ते 3.5 मिलिमीटरची नोंद झाली आहे.
घाटमाथ्यावर सह्याद्रीकडून वेगाने येणारे वारे अडविले जात असल्याने तेथे मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्या मानाने शहर आणि परिसरात हवेच्या वरच्या थरात पाऊस पडण्यासाठी चक्राकार वार्यांचा वेग कमी असल्याने पावसाचा जोर कमी आहे. हा वेग वाढल्यास शहरातदेखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात हा वेग खूपच कमी आहे.
माथ्यावर सतत वार्यांचा वेग हा शहराच्या तुलनेत जास्त आहे. सह्याद्रीकडून येणारे बाष्पयुक्त वारे घाटमाथ्यावर ज्या वेगाने येत आहे, तो वेग शहरात यंदा सतत कमी आहे. वार्याचा वेग हा नॉट या एककात मोजला जातो. अतिवृष्टीसाठी वार्याचा 25 ते 30 नॉट असावा लागतो.
कोकणात 30 ते 35 इतका आहे. त्यामुळे तेथे अतिवृष्टी ते मुसळधार इतका पाऊस पडत आहे. मात्र, शहरात हा वेग 12 ते 15 नॉट इतका कमी आहे. त्यामुळे शहरात यंदा पावसाचा जोर कमी असून, दिवसाला जेथे 40 ते 90 मिमी पाऊस जुलैमध्ये होत असे, तो यंदा केवळ 2 ते 5 मिमीच्या वर पडलेला नाही.
धरणसाखळीतील 8 तासांतला पाऊस (मिमी)
धरण पाऊस टक्केवारी (साठा)
खडकवासला 25 81.43
पानशेत 104 62.89
वरसगाव 105 57.68
टेमघर 70 40.71
असा पडतोय पाऊस..
1 जून ते 24 जुलै सरासरी :287 मि.मी., : 190.8 मि.मी., तूट : 96.9 मि.मी.
1 ते 24 जून : 23 मि.मी.
25 जून मान्सूनचे आगमन (20 मि.मी.)
26 ते 30 जून (30 मि.मी.)
1 ते 15 जुलै : 90 मि.मी.
16 ते 18 जुलै 20 मि.मी.
21 ते 24 जुलै 30
12 तासांतला पाऊस (मिमी)
शिवाजीनगर : 2.9
पाषाण : 2.9
चिंचवड : 3.7
एनडीए : 1.5
कोरेगाव पार्क : 1
हेही वाचा