

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'नासा'च्या नावाने शेकडो लोकांना सहा कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तांदूळ स्वत:कडे खेचून घेणारे धातूचे भांडे असून, त्याचे परीक्षण नासा ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था करणार आहे. त्यांच्या प्रतिनिधींना भारतात आणून त्यांच्या संशोधनाच्या अहवालासाठी मोठा खर्च येतो. या धातूच्या भांड्याच्या विक्रीतून मोठा फायदा मिळू शकतो, असे सांगून सर्वसामान्यांना गडविण्यात आल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी जवळपास 100 जणांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी राम गायकवाड (रा. माळवाड, अकलूज, सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ (रा. कारखेल, पुणे) आणि राहुल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाबासाहेब रामहरी सोनवणे (वय 50, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. 'राईस पुलर' या नावाने देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार आजवर उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादींना राईस पुलर धातूचे भांडे आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी साधू वासवानी चौकाजवळील हॉटेल रिट्टस येथे लोकांचा मेळावा घेतला होता. यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल, असे सांगितले. त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले. मात्र, गुंतविलेल्या पैशावर कोणताच परतावा मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात
आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने याची चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. यात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचे तक्रार अर्ज आले असून, सुमारे 5 ते 6 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक रुईकर यांनी सांगितले.