पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई इंडियन्स विरूध्द लखनौ सुपर जायंट्स या लाईव्ह क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत असताना सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकत क्रिकेट बेटिंगचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले. पुणे-अहमदनगर रस्त्यावरील खराडी भागातील गॅलक्सी वन या सोसायटीतील 9 व्या मजल्यावरील एका फ्लॅटवर हा छापा टाकत सहा जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये छत्तीसगड, पंजाब आणि बिहारमधील 6 मोठ्या बुकींचा समावेश आहे. त्यांच्याकडून 16 मोबाईल हॅन्डसेट, 2 लॅपटॉप, वायफाय राऊटर आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 80 हजार 740 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
जसप्रित मनजिंदरसिंग सिंह (वय 29, मूळ रा. शिवाजीनगर, पंजाब), तरणदीप बलजिंदर सिंह (वय 33, रा. लुधियाना, पंजाब), गौरव दयाराम धरमवाणी ( वय 27, मूळ रा. ब्लॉक शिवानंदनगर, छत्तीसगड), सुनीश तुलशीदास लखवानी (वय 25, मूळ रा. महावीर स्कूल, छत्तीसगड) आणि लालकिशोर दुखीराम (वय 37, मूळ रा. दरभंगा, बिहार), जपजितसिंग आतमजितसिंह बग्गा (वय 25, मूळ रा. रायपूर, छत्तीसगड), अशी अटक केलेल्याची नावे आहेत. ही कामगिरी रिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, संदीप कोळगे, सागर केकाण यांच्या पथकाने केली आहे.