मंचर : पेसा क्षेत्रातील जि. प.शाळांमध्ये शिक्षक नेमणार

मंचर : पेसा क्षेत्रातील जि. प.शाळांमध्ये शिक्षक नेमणार

मंचर : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पेसा क्षेत्रामध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागेवर शिक्षकांची नेमणूक करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी दिले. गटविकास अधिकारी यांनी हे आश्वासन न पाळल्यास घोडेगाव पंचायती समितीसमोर शाळा भरवली जाणार, असा इशारा अखिल भारतीय किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या संघटनांनी दिला. आंबेगाव तालुक्यातील पेसा क्षेत्रामध्ये असलेल्या शाळांमधील पूर्वीचे शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने बदली झालेल्या ठिकाणी रुजू झाले; मात्र त्या ठिकाणी अद्यापही नवीन शिक्षक रुजू न झाल्याने या शाळा शिक्षकाविना आहेत.

या ठिकाणी तत्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी, यासाठी अखिल भारतीय किसान सभा व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) यांनी गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. किसान सभेच्या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद दाखवत गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, गटशिक्षणाधिकारी सविता माळी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि किसान सभा व एसएफआयच्या शिष्टमंडळासोबत संयुक्त बैठक घोडेगाव पंचायत समिती कार्यालयात झाली.

या वेळी झालेल्या चर्चेत किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे यांनी म्हटले की, संबंधित अधिकारी यांनी पेसा क्षेत्रामध्ये शिक्षकांची बदली करत असताना व त्या शिक्षकाला त्या शाळेमधून कार्यमुक्त करत असताना व त्याच्या जागेवर नवीन शिक्षक आले नसतानाही त्या शिक्षकांना कार्यमुक्त का केले? या ठिकाणी तत्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा पालक, विद्यार्थी यांना सोबत घेऊन शाळांना कुलूप लावून आम्ही आंदोलन करू. तसेच एसएफआय राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा एसएफआय आंबेगाव तालुका सचिव समीर गारे यांनी दिला.

पुढील पंधरा दिवसांत नियमित शिक्षक शाळेवर रुजू न झाल्यास पालक, विद्यार्थी व संघटनेचे कार्यकर्ते पंचायत समितीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार आहे व पंचायत समितीसमोरच शाळा भरवली जाईल, अशी भूमिका किसान सभेचे नेते अशोक पेकारी, रामदास लोहकरे यांनी मांडली. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे, आंबेगाव तालुका सचिव रामदास लोहकरे, सहसचिव दत्ता गिरंगे, कार्याध्यक्ष बाळू काठे, एसएफआय तालुका अध्यक्ष दीपक वालकोळी, अर्जुन काळे, सागर पारधी आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news