राजेवाडीतील सागाच्या झाडांची बेसुमार तोड | पुढारी

राजेवाडीतील सागाच्या झाडांची बेसुमार तोड

भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा :  आंबेगाव तालुक्यातील राजेवाडी हद्दीतील पेसा क्षेत्रात शेकडो सागाच्या झाडांची बेकायदाशीरपणे बेसुमार तोड तसेच लाकडांची साठवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, वन विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबतचा सुगावा का लागला नाही, असा प्रश्न वनप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून महाराष्ट्र वन व पेसा कायद्यानुसार दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत राजेवाडीच्या सरपंच शुभांगी साबळे यांनी तहसीलदार, पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी व वन विभाग यांच्याशी लेखी पत्रव्यवहार केला आहे.

राजेवाडी ही पेसा ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या शेकडो सागाच्या झाडांची तोड करून लाकडांची साठवणूक केल्याची बाब समोर आली. मात्र, ही वृक्षतोड नेमकी कुठे करण्यात आली आहे. याबाबतची ठोस माहिती अद्यापि मिळाली नाही. प्रथमदर्शनी राजेवाडी गावच्या खालील असलेल्या कोलतावडे, मापोली, डिंभे या गावांंच्या लागून असलेल्या भागात सागांच्या झाडांची तोड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सागाच्या झाडांची तोड करून लाकडांची वाहतूक करून ती राजेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत टाकली जात आहेत. तेथेच अनधिकृतपणे महावितरणच्या विद्युत खांबावरून वीजजोड घेऊन त्यांची कापणी सुरू आहे. लाकडे साठवणूक करण्यासाठी किंवा कापणी करण्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा ठेकेदाराने ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे ही वृक्षतोड कायदेशीर आहे की बेकायदेशीर याची चौकशी व्हावी, दोषींवर महाराष्ट्र वन व पेसा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी राजेवाडी गावच्या सरपंच व ग्रामस्थ यांनी केली आहे.

आदेशानुसार दोषींवर कारवाई करणार
वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व वनक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. संबंधित साग वृक्षतोड खासगी क्षेत्रात केली आहे की वनक्षेत्रात झाली याचा तपास सुरू आहे. तपासाअंती संबंधित साग वृक्षतोड अनधिकृत आढळल्यास दोषींवर वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल, असे गारगोटे यांनी सांगितले.

 

Back to top button