

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील दक्षिण – पूर्व पट्ट्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलै महिना संपत आला तरी, तालुक्यात अजूनही पावसाने जोरदार हजेरी लावलेली नाही. रिमझिम पावसाच्या भरवशावर पुरंदर तालुक्यातील शेतकर्यांनी खरिपाची पेरणी केली होती. मात्र, पाऊस लांबल्याने पीक जळून जाते की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. मागील दोन दिवसांपासून तालुक्यात पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. यामुळे पीक वाचले असले तरी पिण्याच्या पाण्याची स्थिती अद्याप सुधारलेली नाही. वाल्हे, राख, पिसुर्टी, पिंगोरी, नारायणपूर अशा अनेक गावांमधील वाडी-वस्त्यांवर सध्या पाणीटंचाई आहे. ऐन पावसाळ्यात या परिसरात टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे.
पुरंदर तालुक्यात काही ठिकाणी बाजरी, हुलगा, मटकी, वाटाणा, सोयाबीन, सूर्यफुलाची पेरणी सुरू आहे. दक्षिण पूर्वपट्ट्यातील राख, गुळुंचे, कर्नलवाडी, नावळी, मावडी, वाल्हे या भागांत अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची वेळ आली आहे. पश्चिम भागात खाचरांमध्ये पाणीच नसल्याने भात लागवड करायची कशी ? असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे.
'पुरंदर तालुक्यातील अनेक गावांमधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या आपत्ती व्यवस्थापनामार्फत पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. लोकांनी मागणी केल्यास, ट्रस्टच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो, असे टँकर चालक प्रवीण शिंदे यांनी सांगितले. रिमझिम पावसावर पेरणी केली. आता पाऊस लांबला आहे. त्यामुळे खरिपाचे पीक हातचे जाण्याची वेळ आली आहे. बाजरी, मटकी, हुलगा, वाटाणा अन्य पिकांचे नुकसान होणार आहे. मागील दोन दिवसांत पडलेला पाऊस पाहता थोड्या प्रमाणात पिके वाचू शकतील, असे सुकलवाडीतील शेतकरी संतोष पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा :