वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्ह्यालगतच्या वेल्हे तालुक्यातील तोरणा खोर्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. ओढ्याला आलेल्या पुरात पासली ते भुंतोडे मार्गे राजगड-भोर रस्त्यावरील बालवड (ता. वेल्हे) येथील पुलासह रस्ता बुडाला. त्यामुळे वेल्हे तसेच भोर तालुक्यातील आठ गावांचा संपर्क तुटला आहे. बुधवारी (दि. 19) सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक पूर येऊन पूल बुडाला. त्या वेळी विद्यार्थ्यांसह शेतकरी रस्त्यावरून पायी चालले होते.
त्या वेळी मोटारसायकलवरून चाललेले स्थानिक ग्रामसेवक लोंढे यांनी शेतकरी, विद्यार्थ्यांना दूर अंतरावर थांबवले. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांनाही दोन्ही बाजूला थांबवले. त्यामुळे दुर्घटना टळली. दरम्यान, गुरुवारी (दि. 20) सकाळी पावसाचा जोर थोडा कमी झाला. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली; मात्र पुलावरून पाणी वाहत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने पुलावरून कशीबशी वाहतूक सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दरवर्षी पावसाळ्यात पुलावर दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. ओढ्यावरील पूल कमी उंचीचा आहे. पुलाला संरक्षक कठडेही नाहीत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जाऊन गेल्या वर्षी गायी, गुरे वाहून गेली होती, तर एका व्यक्तीचा मृत्यूदेखील झाला होता.
नवीन प्रशस्त पूल उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, दोन वर्षांत शासनाकडून निधी मिळाला नाही. पावसाळ्यानंतर पुलाला संरक्षक कठडे बसविण्यात येणार आहेत.
– संजय संकपाळ, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागराजगड, तोरणागड तसेच मढे घाट परिसरात पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांसह स्थानिक शेतकरी, विद्यार्थ्यांची वाहतूक या रस्त्यावर सुरू आहे. पुणे तसेच राजगड, भोरकडे जवळच्या अंतराने जाता येत असल्याने या रस्त्यावर अलीकडच्या काळात वाहतूक वाढली आहे.
– प्रकाश जोरकर, स्थानिक रहिवासी
हेही वाचा :