सावधान ! ...तर पुण्यातही होऊ शकते इर्शाळवाडी | पुढारी

सावधान ! ...तर पुण्यातही होऊ शकते इर्शाळवाडी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुण्यात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने शहरालगतच्या टेकड्यांवर, टेकड्यांलगत बांधकामे झाली. काही वर्षांपूर्वी निर्मनुष्य असलेल्या डोंगराळ भागात वस्ती झाली. कात्रज तसेच इतर भागातील डोंगर अनधिकृतपणे फोडल्याने भविष्यात पुण्यातही इर्शाळवाडीसारखा धोका उद्भवू शकतो, असे मत तज्ज्ञांनी  दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले. दरड कोसळण्यापूर्वी काही संकेत कळतात, त्यामध्ये डोंगरमाथ्यावर भेगा पडणे, पाणी जास्त मुरण्यासारखे प्रकार होतात.
गावांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनापर्यंत ही माहिती गावातील स्थानिकांनी पोहोचवली पाहिजे. त्यानंतर प्रशासकीय उपाययोजना केल्या जातात. मात्र, अनेकदा या बाबी प्रशासनापर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येत असल्याचेही भूगोल अभ्यासकांनी म्हटले आहे. दरडी कोसळण्याचे प्रकार हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन कारणांमुळे होतात. इर्शाळवाडी येथील काही वर्षांपूर्वीची सॅटेलाईट छायाचित्रे पाहिली तर झाडांचे प्रमाण जास्त दिसत होते.
तात्पुरते स्थलांतर आवश्यक
धोकादायक ठिकाणे निश्चित झाल्यानंतर त्या गावांतील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे अत्यंत आवश्यक आहे. गावातील धोक्याच्या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. प्रत्येकाला आपल्या गावाची माहिती असते.
छोटी-छोटी ठिकाणे ओळखली पाहिजेत
 गावोगाव सर्वेक्षण होऊन दरडप्रवण गावांमधील अशी छोटी-छोटी ठिकाणे शोधली पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाकडून ऑनलाईन यंत्रणा तयार करणे गरजेचे आहे. शहरी भागातही बांधकामेदेखील धोकादायक आहेत. कात्रजसारख्या भागात अशा घटना घडू शकतात.   
                                                                                  – श्रीकांत गबाले, भूगोल अभ्यासक
दरडी कोसळण्यापूर्वी प्रशासनाकडून आणि स्थानिक नागरिकांकडून पूर्वतयारी अत्यंत आवश्यक आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे अशा घटना अलीकडील काही दिवसांमध्ये बघण्यास मिळत आहेत. 
                                                        – सतीश ठिगळे, भूपर्यावरणाचे अभ्यासक  
हेही वाचा :

Back to top button