पुणे : पुढारी वृत्तसेवा : राजस्थान येथील बेकायदेशीर प्रतिबंधक हालचालीच्या गुन्ह्यात फरार झाल्यानंतर पुण्यात तब्बल दीड वर्षे वास्तव्य करणार्या संशयित दहशतवाद्यांकडून मोबाईल, लॅपटॉप तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य सापडले. याचे तांत्रिक व फॉरेन्सिक विश्लेषण केल्यानंतरच या कटाची कडी उलगडणार असल्याची दाट शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे. हस्तगत केलेल्या साहित्यांची पुणे पोलिस, एटीएस आणि एनआयए या तपास यंत्रणा गुन्ह्याचा समांतर तपास करत असल्याने लवकरच मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी मोहम्मद इम्रान खान उर्फ अमीर अब्दुल हमीद खान तसेच मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी अशा दोघांना बेड्या ठोकल्या. त्याच धर्तीवर सर्व यंत्रणा पुण्यात दाखल झाल्या आहेत. राजस्थान येथील चितोडगडमध्ये मागील वर्षी स्फोटके आढळल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात 'एनआयए'ने काही जणांना अटक केली होती. तर त्यातील काहीजण फरार झाले होते. त्यात खान आणि साकीदेखील होते. त्यांच्यावर फरार झाल्यानंतर पाच लाखांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. मात्र, अद्याप अनेक प्रश्न अनुउत्तरीत असून, यंत्रणा तपास करत आहेत.
दहशतवाद्याचा कसून शोध
दुचाकी चोरताना कोथरूड पोलिसांच्या तावडीतून एकजण पळून जाण्यास यशस्वी झाला. पळून गेलेल्या त्या दहशतवाद्याचा पुणे पोलिस, एनआयचे राजस्थान पथक, मुंबईचे एनआयएचे पथक तसेच त्याबरोबर एटीएसचे पथक त्याच्या शोध कामी लागली आहेत.
तपास एटीएसकडे जाण्याची शक्यता
पुण्यात दोन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती आणि अटक केलेल्या आरोपींच्या संशयास्पद हालचाली पाहता हा तपास पुढील काही दिवसात दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मध्य प्रदेश…राजस्थान व्हाया मुंबई ते पुणे दोघांचे वास्तव्य
2022 मध्ये राजस्थान येथे अल सुफा संघटनेचे संशयितांना छापे टाकून पकडण्यात आले होते. तेव्हापासून अटक करण्यात आलेले खान आणि साकी यांनी तेथून पळ काढला होता. सुरवातीला त्यांनी मुंबई येथील भेंडीबाजार येथे दोन ते तीन दिवस वास्तव्य केले. त्यानंतर रमजान महिन्यात पुण्यात आले. कोंढव्यात ते एका सार्वजनिक ठिकाणी राहिले. त्याचवेळी कोढव्यातील एका व्यक्तीसोबत त्यांची ओळख झाली. आठ हजार रुपये पगारावर ते काम करत होते. पुढे एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी वास्तव्य केले. पुढे फरार आरोपी आलम याच्यासोबत ओळख झाली. त्याने दोघांना आयटी कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिघे मिठानगर येथील एका खोलीत राहू लागले.
हे ही वाचा :