अजित पवारांसोबत गेल्याने खेड, आंबेगावला 80 कोटींचे ’गिफ्ट’

अजित पवारांसोबत गेल्याने खेड, आंबेगावला 80 कोटींचे ’गिफ्ट’

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाचपैकी खेडचे दिलीप मोहिते पाटील आणि आंबेगावचे दिलीप वळसे पाटील हे दोन आमदार पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. या दोन्ही आमदारांना पहिल्याच अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये तब्बल 80 कोटींचा निधी देत पवार यांनी आपण विकासासाठीच सत्तेत सहभागी झाल्याचे दाखवून दिले.

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच बालेकिल्ला राहिला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले. हे पाचही आमदार तसे पाहिले तर अजित पवार यांचे समर्थक म्हणूनच ओळखले जातात. यामध्ये आंबेगावचे आमदार व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जात असले, तरी त्यांनीदेखील मी माझ्या तालुक्याच्या विकासासाठी अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाल्याचे जाहीरपणे सांगितले. तर, खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे नेहमीच अजित पवार यांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले आहेत. पहिल्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी आणि आतादेखील अजित पवार यांचा निर्णय योग्य असल्याचा व आमच्या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच अजितदादांसोबत राहू, असे जाहीरपणे सांगणारे एकमेव आमदार म्हणून दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

या दोन्ही आमदारांना त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे गिफ्ट लगेचच मिळाले आहे. आंबेगाव तालुक्याला आदिवासी भागाच्या विकासासाठी 29 कोटी 80 लाख, तर बिगर आदिवासी भागासाठी 25 कोटींचा भरघोस निधी मिळाला आहे. तर, खेड तालुक्याला पश्चिम पट्ट्याच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी देऊन अजित पवार यांनी खूष केले आहे.

अजित पवार यांच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. अजितदादांनी माझे राजकीय
अस्तित्व निर्माण करून दिले. यामुळेच ज्या ठिकाणी अजितदादा आहेत, त्याच ठिकाणी आम्ही जाणार. अजित पवार म्हणजे विकासाचा महामेरू, विकासपुरुष म्हणून त्यांची ओळख संपूर्ण राज्याला आहे. यामुळेच पहिल्याच पुरवणी मागण्यांमध्ये माझ्या तालुक्यासाठी तब्बल 25 कोटींचा निधी मिळाला आहे. मुख्यमंत्रीसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यामुळे भविष्यात खेड तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी मोठा निधी मिळेल. तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न, प्रकल्प मार्गी लागतील, अशी अशा निर्माण झाली आहे.
                      दिलीप मोहिते पाटील, आमदार खेड-आळंदी विधानसभा

logo
Pudhari News
pudhari.news