सरदवाडी घाटात कचर्‍याचे ढीग शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

सरदवाडी घाटात कचर्‍याचे ढीग शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर-चौफुला महामार्गावर सरदवाडी घाटात कचर्‍याचे साम्राज्य पसरले असून, जवळ शाळा असून शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिरूर-चौफुला महामार्गावर सरदवाडी घाटात गेल्या काही महिन्यांपासून कचरा वाहतूक करणार्‍या काही गाड्या येत आहेत. घाटात कचरा टाकून जातात. या ठिकाणी सरदवाडी गावची हद्द असून, जवळ इंग्रजी माध्यमाची खासगी शाळा आहे. ही शाळा खोलगट भागात आहे तर चढावर कचरा डंपिंग ग्राउंड तयार झाले आहे. या ठिकाणी कचरा वाहतूक करणार्‍या काही गाड्या येऊन अचानक रात्रीच्या सुमारास प्लास्टिक, हॉटेलचे खराब अन्न, तसेच विविध प्रकारचा कचरा टाकला जातो. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. जवळ शाळा खोलगट भागात असल्याने वार्‍याने दुर्गंधी लांबवर जाते.

रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांनादेखील त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. सरदवाडी घाटात या पूर्वी थोडा कचरा टाकला जात असायचा. मात्र, दिवसेंदिवस कचरा वाढत जात असल्याने हा कचरा डेपो झालाय की काय असा सवाल आता पडत असून, बेजबाबदारपणे कचरा टाकणार्‍या त्या संबंधित ग्रामपंचायतला कोण समज देणार का ? घाटाचे विद्रुपीकरण करून नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार्‍या या चाललेल्या प्रकाराबाबत कोणी गांभीर्याने कारवाई करणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सदर कचरा हा कोणाचीही परवानगी न घेता टाकला जात आहे. याबाबत अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायतीला एवढा मोठा कर मिळत असतानासुध्द्दा कचरा डेपो करू शकले नाही तसेच लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून, स्वत:ला आदर्श म्हणवणारे ग्रामपंचायतीसाठी साध्या गोष्टी करू शकत नाही यासारखे मोठे दुर्दैव नाही.

Back to top button