तळेगाव-चाकण महामार्गाला आले तळ्याचे स्वरुप | पुढारी

तळेगाव-चाकण महामार्गाला आले तळ्याचे स्वरुप

तळेगाव स्टेशन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तळेगांव दाभाडे येथील तळेगांव चाकण महामार्गावर पावसाचे आणि गटारीचे पाणी वाहत असल्यामुळे महामार्गाला तळ्याचे स्वरुप आलेले आहे. या ठिकाणी इंद्रायणी महाविद्यालय, कांतीलाल शाह विद्यालय, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये सुमारे चार हजार विद्यार्थी शिकत आहेत. विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची ये-जा असते. मुख्य भाजी मंडई, मशिद याच परिसरात महामार्गाच्या कडेला असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

महामार्गावर वाहने सतत ये- जा करत असतात यामध्ये अवजड वाहनेही असतात. एकेरी रस्ता असल्याने पादचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना चालायला रस्ता अपुरा पडतो. त्यातच या ठिकाणी असलेली गटार तुंबून रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे येथे तळ्याचे स्वरुप आलेले आहे. नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागते. शाळा कॉलेज भरताना आणि सुटल्यावर विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे जिकरीचे आणि धोकादायक होत आहे.

वाहने वेगात जात-येत असल्यामुळे जीव मुठीत धरून रस्त्याच्या मधूनच सर्वांना चालावे लागते. या ठिकाणी अनेक अपघात होवून जिवीतहानी झालेली आहे. वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम खाते आणि तळेगांव दाभाडे नगरपरिषदेच्या निदर्शनास आणूनही यावर काहीच कार्यवाही झालेली दिसून येत नाही. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी नागरिकांची, विद्यार्थ्यांची आणि पालकांची आग्रही मागणी आहे.

अनेक वर्षापासुन या ठिकाणी पावसाळ्यात अशीच धोकादायक परिस्थिती असल्यामुळे जिवीतहानी झालेली आहे, तरी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी.

दिलीप डोळस, उपाध्यक्ष तळेगाव-चाकण महामार्ग कृतीसमिती

Back to top button