

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : परिसरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. याविषयी वारंवार तक्रार करूनदेखील अधिकारी दखल घेत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात
अधिकारी लोकांच्या जीविताशी खेळत आहेत. महापालिकेतील संबंधित अधिकारी तसेच प्रशासक यांनी या समस्यापासून कायमस्वरूपी सुटका करावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. भोसरी परिसरात काही भागात पवना धरणातून तर काही भागात आंध—ा, भामा आसखेड प्रकल्पातून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु दिवसाआड होणार्या पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. आता त्यात भर की काय दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. तसेच, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी
भोसरी परिसरातील हुतात्मा चौक, हनुमान कॉलनी परिसर, गवळीनगर आदी परिसरात दूषित पाणीपुरवठा सतत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी इंद्रायणीनगर परिसरातदेखील नागरिकांना दूषित पाणीपुरवठाचा सामना करावा लागला होता. ड्रेनेजलाइन चोकअपमुळे दूषित पाणी येत असल्याचे अधिकारी नेहमी सांगतात. परंतु, ते कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
नागरिकांना घ्यावे लागते विकतचे पाणी
अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या नागरिकांसाठी ही बाब भुर्दंड देणारी ठरत आहे. प्रशासनाने दखल घेऊन परिसरात शुध्द पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
परिसरात दूषित पाणी का येते हे नागरिकांना समजले पाहिजे. पाणीपुरवठा विभाग व जल:निसारण विभागाने संयुक्तपणे जलवाहिन्यांची व ड्रेनेज लाइनची तपासणी केली पाहिजे. एकत्र झालेल्या ड्रेनेज लाइन व जलवाहिन्या वेगळ्या केल्या पाहिजेत. – सागर गवळी, माजी नगरसेवक