लोणावळ्याला मुसळधार पावसाने झोडपले ; 24 तासांत तब्बल 212 मिमी पावसाची नोंद  | पुढारी

लोणावळ्याला मुसळधार पावसाने झोडपले ; 24 तासांत तब्बल 212 मिमी पावसाची नोंद 

लोणावळा : शहर आणि परिसरात रविवारी दुपारनंतर पावसाने जोरदार कमबॅक केले असून, सोमवारी सकाळपासून मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत तब्बल 212 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी एकाच दिवसात पडलेला हा आतापर्यंतचा सर्वांधिक पाऊस असून, मंगळवारीदेखील पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच होती. त्यामुळे शहरातील काही रस्त्यांवर तसेच काही सखल भागात पाणी भरल्याचे चित्र दिसत आहे.

भात लावणीला आला वेग
पावसामुळे चिंतातूर झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून, आजूबाजूच्या खेडेगावातील शेतकर्‍यांनीदेखील भात लावणीची तयारी सुरू केली आहे. लोणावळा शहरात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा पाऊस तब्बल 1000 मिलीमीटरने मागे आहे; परंतु हवामान विभागाने पुढील चार दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे हा फरक पाऊस भरून काढेल, अशी अपेक्षा आहे. यावर्षी मंगळवारी (दि. 18) सकाळपर्यंत एकूण 1524 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, मागील वर्षी या तारखेपर्यंत 2515 मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला होता.

नद्या दुथडी भरून वाहू लागल्या
लोणावळा शहरात पडत असलेल्या पावसामुळे येथील तुंगार्ली, वलवण, लोणावळा या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली असून, पवना धरणातदेखील बॅकवॉटरद्वारे पाणी भरू लागले आहे. भुशी धरण यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले असून, त्याच्या सांडव्यावरून वाहून येणारे पाण्यामुळे लोणावळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दुसरीकडे लोणावळा शहराच्या भोवताली असलेल्या डोंगरकड्यावरून अनेक धबधबे प्रवाहित झाले असून, इंद्रायणी नदी, उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

शहरातील तुंगार्ली, भांगरवाडी, रायवूड याठिकाणी पावसामुळे अनेक झाड पडल्याच्या घटना घडल्या आहे. यातील न्यू तुंगार्ली येथील नगर परिषद रोडवर व वीज वितरणच्या लाईनवर पडलेले एक झाड, कैलास पर्वत हॉटेल समोर मुंबई-पुणे हायवे रोडवर पडायला झालेले मोठी रेन ट्री झाडाच्या फांद्या, रायवुड येथील एसबीआय बँक गेस्ट हाऊस रोडवर व वीजवितरणच्या लाईनवर पडलेले गुलमोहराचे झाड, भांगरवाडी येथील निशिगंधा सोसायटी रोडवर पडलेले माडाचे झाड नगर परिषदेच्या उद्यान विभागाने तात्काळ काढून घेतले आहे. मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानविभागाचे कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यास सज्ज असल्याचे उद्यान विभागाचे जितेंद्र राऊत यांनी सांगितले आहे.

हवामान खात्याचा अंदाज पाहता वादळी वार्‍यासह तीव्र किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच, झाडाखाली उभे राहू नये किंवा गाड्या पार्क करू नये. काही अडचण उद्भवल्यास नगर परिषदेशी संपर्क साधावा. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये.
                                   – पंडित पाटील, मुख्याधिकारी, लोणावळा नगर परिषद

Back to top button