खेड विधान सभा, शिरूर लोकसभेवर भाजपचे विशेष लक्ष ! शरद बुट्टे पाटील भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा | पुढारी

खेड विधान सभा, शिरूर लोकसभेवर भाजपचे विशेष लक्ष ! शरद बुट्टे पाटील भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा

 सुषमा नेहरकर-शिंदे : 

पुणे :  गेले दोन वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने शिरूर लोकसभा आणि खेड विधान सभा मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आता खेड विधान सभा मतदार संघातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्याकडे भाजप जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देऊन पुन्हा एकदा यावर शिक्कामोर्तब केला आहे. बुट्टे पाटील यांना पक्ष संघटनेच्या कामाचा मोठा अनुभव असल्याने पश्चिम पुणे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात पक्ष संघटनेत अनेक मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये गेले दोन वर्षे केंद्रीय मंत्र्यांनी विविध लोकसभा मतदार संघात चार-चार दिवसांचे दौरे केले. या दौ-यांमध्ये केंद्रीय मंत्र्यांकडून स्थानिक प्रश्न, केंद्र शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचल्या का या गोष्टींचा आढावा घेण्यासोबतच पक्ष संघटनेची स्थानिक पातळीवरील स्थिती, कोण किती काम करते यांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्यादृष्टीने गेल्या एक दीड वर्षांत भाजपच्या वतीने अशा काही नवीन चेहर्यांना जाणीवपूर्वक पुढे आणले जात आहे.

यामध्ये खेड विधानसभा मतदार संघातील शरद बुट्टे-पाटील यांचा समावेश आहे. पुण्यातील माजी नगरसेवक व पक्षाचे नेते म्हणून ओळख असलेल्या गणेश बिडकर यांची जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्ती रद्द करून शरद बुट्टे – पाटील यांना संधी देण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या कामाचा तगडा अनुभव लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन व सनियंत्रण उप समितीचे अध्यक्षपद बुट्टे पाटील यांना दिले. बुट्टे पाटील यांनी दोन महिन्यात आपल्या कामाची छाप पाडत जिल्हा नियोजन समितीच्या कामाला गती दिली. यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी बुट्टे पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्याच्या कामांचा आढावा घेण्याचे अधिकार देखील दिले. आपल्या कामाच्या जोरावर पक्ष नेतृत्वाचा विश्वास संपादन केल्यानेच आता थेट शिरूर-मावळ लोकसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा बुट्टे पाटील यांच्यावर सोपविण्यात आली.

भारतीय जनता पार्टी ने माझ्या कामावर विश्वास ठेऊन पुणे जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष पदी (शिरूर आणि मावळ) निवड केल्याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचे अगदी मनापासून आभार मानतो. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडवणीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे नेते आणि माझे मार्गदर्शक प्रदेश उपाध्यक्ष संजय भेगडे यांचे मी मनापासून आभार मानतो.यांचेसह राज्यातील आणि जिल्यातील पक्षाचे नेते आणि सर्व सामान्य कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानतो. पक्ष संघटना वाढविणे आणि त्यासाठी कार्यकर्ते सक्षम करून सामान्य माणसाचे हितासाठी काम करणे आणि त्यातून स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळून देणे यासाठी मी प्रामाणिक काम करणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वानाच आदर करत काम करणार आहे.ज्येष्ठ,जुन्या आणि नवीन सर्व कार्यकर्त्यांचा आदर केला जाईल. मावळते जिल्हा अध्यक्ष, गणेशतात्या भेगडे यांचे सह त्यांचे बरोबरचे सर्व टीम चे सहकार्य घेऊन काम करायचे आहे. ज्यांचेमुळे भाजपशी जोडलो गेलो त्या गिरीश बापट यांच्या स्मृतीला अभिवादन करतो.
                           – शरद बुट्टे पाटील अध्यक्ष,भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा 

 

Back to top button