हिंजवडी: माण रस्त्यावर वाहतूककोंडी, आयटीयन्स हैराण | पुढारी

हिंजवडी: माण रस्त्यावर वाहतूककोंडी, आयटीयन्स हैराण

हिंजवडी (पुणे) : पावसाळा सुरू झाल्यानंतर हिंजवडी-माण रस्त्यावर फेज 3 कडे जाणारा रस्ता वाहतुककोंडीमुळे वाहनचालकांना अडचणीत आणत आहे. आजही मंगळवारी (दि. १८ जुलै) रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या प्रमाणावर येथे वाहने अडकून पडली. तब्बल तीन तास परिस्थिती जैसे थे होती. यामुळे नागरिकांना नाहक त्रास तर झालाच शिवाय, आयटीयन्सना देखील तासंतास रस्त्यात थांबून रहावे लागले. सदर माण- हिंजवडी रस्ता हा घोटावडे- बेबड ओहोळ राज्य महामार्ग म्हणून नोंद करण्यात आलेला आहे. परंतु, सिंगल लेन रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच नव्याने म्हाळुंगे मार्गे पुणेकडे जाणारे प्रवासी, आयटी पार्कचे कर्मचारी आणि नव्याने सुरू झालेल्या सोयासायटीतील रहिवासी देखील या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक क्षमतेच्या अधिक प्रमाणात होत आहे. मात्र त्या प्रमाणात सोयीसुविधा येथे उपलब्ध नाहीत .तसेच पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाचे पुरेसे लक्ष नसल्याने येथे वाहतूक कोंडी होत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.

त्वरित वाहतूक कर्मचारी आणि वॉर्डन नेमून त्यांना आवश्यक सूचना देण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. प्रामुख्याने माण येथील माणदेवी चौकात अरुंद असलेल्या रस्त्यामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प होते. परिणामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. मंगळवारी देखील तब्बल २ ते ३ तास हा प्रकार सुरू होता. यापूर्वी येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत वाहतुक कोंडी सोडवली होती. आजही काही प्रमाणात असेच चित्र होते. मात्र, वाहतूक विभागाचे कर्मचारी कुठेही दिसत नव्हते. याउलट ग्रामपंचायतचे सहा-सात कर्मचारी येथे असल्याने काही कालावधीनंतर वाहतूक नियंत्रणात आली. माणदेवी चौक ते राक्षे वस्तीपर्यंत असलेल्या वाहतुककोंडीने आयटी कर्मचारी हैराण झाले होते.

वाहतूक विभागाच्या वतीने माण येथे वाहतूक कर्मचारी देण्याची वारंवार मागणी करण्यात येत आहे. यासंबंधी पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. मात्र पोलीस आणि वाहतूक विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. वाहतूककोंडी होत असताना अनेकदा ग्रामपंचायत कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरतात. वाहतुकीबाबत योग्य माहीती आलेल्या कर्मचाऱ्यांना येथे सकाळी आणि संध्याकाळी नेमण्याची व्यवस्था करण्यात यावी.

                                  –  अर्चना सचिन आढाव (सरपंच, माण ग्रामपंचायत)

माण येथे वारंवार वाहतूककोंडी होत असते, यासाठी वाहतूक शाखा हिंजवडीच्या वतीने काही फिरती वाहने येथे नेमली आहेत. यामुळे वाहतुकोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, त्यास यश मिळत आहे. परंतु तरीही वाहतूककोंडी होत आहे. पुढील काळात वाहतूककोंडी सोडवण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील.

         –   गणेश पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग हिंजवडी)

Back to top button