उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ठाण्यांसह पथकांना शाबासकी : पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे | पुढारी

उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ठाण्यांसह पथकांना शाबासकी : पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांवर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे आणि सहआयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी शाबासकीची थाप मारली. वरिष्ठांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे कामाची दखल घेतल्याने संबंधित प्रभारी अधिकार्‍यांचे मनोबल उंचावल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित एकूण 18 पोलिस ठाणी आहेत. यांसह गुन्हे शाखेच्या पाच युनिटससह इतर दहा महत्वाच्या शाखा आहेत. दरम्यान, यामधील उत्कृष्ट काम करणार्‍या ठाण्यांसह पथकांच्या कामाची दखल घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार, पहिल्यांदाच पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच, त्यांच्यासोबत फोटो सेशनही केले. ज्यामुळे पथकातील कर्मचार्‍यांसह प्रभारी अधिकार्‍यांचे मनोबल उंचावले आहे.

वाकड पोलिसांनी दरोड्याचा डाव उधळला
वाकड पोलिसांनी गणेशनगर, डांगे चौक येथील फेड बँकेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक केली. आरोपी बँकेच्या भिंतीला भगदाड पाडत असताना पोलिस समोर हजर झाल्याने आरोपींचा डाव फसला. तसेच, एका गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून 22 गुन्हे उघडकीस आणले. या दोन्ही कामांची दखल घेऊन वरिष्ठ निरिक्षक गणेश जवादवाड यांच्या पथकावर पोलिस आयुक्त चौबे यांनी कौतुकाची थाप मारली.

भोसरी पोलिस निर्गतीत अव्वल
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मुद्देमाल निर्गतीसाठी विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये भोसरी पोलिस अव्वल ठरले. तब्बल एक हजार 750 मुद्देमालाची भोसरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत निर्गती केली. ज्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.

सोनसाखळी चोरट्यांवर मोकाचा ठोका
शहरात सोनसाखळी चोर्‍या वाढल्याने पोलिस आयुक्त चौबे यांनी प्रभारी अधिकार्‍यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, दिघी पोलिसांनी रात्रंदिवस माग काढून अट्टल सोनसाखळी चोरटे जेरबंद केले. त्यांच्याकडे तपास करून एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले. या गुन्ह्यातील आरोपींवर दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. त्यामुळे वरिष्ठ निरिक्षक मच्छिंद्र पंडित यांनी आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करून त्यांना तुरुंगाची हवा खाण्यासाठी पाठवून दिले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिघी पोलिसांचे विशेष कौतुक करण्यात आले.

कायदा व सुव्यवस्था राखली
समाज कंटकांचा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चाकण पोलिसांनी हाणून पाडला. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. तसेच, एटीएम फोडण्याच्या किचकट गुन्ह्याचे सीसीटीव्ही तपासून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर परिसर पिंजून काढून आरोपीला चाकण येथील माणिक चौकातून अटक केली. वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मागदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चाकण पोलिसांनीही वरिष्ठांची शाबासकी मिळवली.

वृद्धेच्या खुनाचा छडा
भरदिवसा घरात घुसून डोक्यात खलबत्ता मारून 68 वर्षीय वृद्ध महिलेच्या खुनाची घटना घडली होती. या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. कोणताही धागादोरा नसताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शेजारी राहणार्‍या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. महिलेने अपमान केल्याने आपण खून केला, अशी कबुली आरोपीने दिली. या गुन्ह्याची उकल केल्याने युनिट एकचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाची दखल पोलिस आयुक्त चौबे यांनी घेतली.

विकृतांच्या टोळीची धरपकड
महिलांचा विनयभंग करून त्यांच्या गळ्यातील सोने पळवून नेणार्‍या टोळीने शहरात उच्छाद मांडला होता. ज्यामुळे महिला दहशतीखाली आल्या होत्या. युनिट चारच्या पथकाने आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणले. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांच्या कामगिरीबाबत पोलिस आयुक्त चौबे यांनी त्यांची पाठ थोपटली.

आवारेंचा खून; आरोपींची बदल्याची तयारी
मावळ येथील किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीतील आरोपींना पोलिसांनी वेळीच अटक केली. त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दरोडा विरोधी विभागाच्या तत्परतेमुळे मोठी घटना टळली. पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम आणि सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख यांच्या या कामगिरीचे वरिष्ठांनी कौतुक केले.

मुख्य सूत्रधार भानू खळदेच्या मुसक्या आवळल्या
किशोर आवारे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार भानू खळदेच्या गुंडाविरोधी पथकाने नाशिक येथून मुसक्या आवळल्या. आवारे खूनप्रकरणात भानू खळदेची अटक महत्वाची मानली जात होती. तसेच, खून प्रकरणात पोलिसांना चकवा देणार्‍या सराईत गुन्हेगारांना पथकाने उत्तर प्रदेशातून अटक केले. आरोपींनी खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मायक्रो प्लानिंग केले होते; मात्र गुंडा विरोधी पथकाने आरोपींच्या प्लानिंगच्या चिंध्या केल्या. या दोन्ही कामगिरीबाबत पोलिस आयुक्त चौबे यांनी पथक प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने यांचे कौतुक केले.

Back to top button