पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घातला डायलिसिस सेंटरच्या खासगीकरणाचा घाट | पुढारी

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घातला डायलिसिस सेंटरच्या खासगीकरणाचा घाट

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या आरोग्य विभागाने खासगीकरणाचा सपाटा सुरूच ठेवला आहे. शहरात महापालिकेची 15 डायलिसिस सेंटर आहेत. यापैकी केवळ दोन सेंटरमधील यंत्रणा महापालिकेच्या मालकीची आहेत. उर्वरित सेंटर खासगी संस्थांना चालवण्यास देण्यात आली आहेत. आता कोथरूडमधील कै. सुंदराबाई गणपत राऊत दवाखान्यातही खासगी संस्थेतर्फे महापालिका डायलिसिस सेंटर सुरू केले जाणार आहे.

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात लायन्स क्लबतर्फे डायलिसिस सेंटर चालवले जाते. जुलै महिन्यात जवळपास 15 दिवस सेंटर बंद होते. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. महापालिकेच्या मुख्य रुग्णालयातील सेंटर व्यवस्थित सुरू नसताना त्याकडे कानाडोळा करून नवीन सेंटर सुरू करण्याचा आटापिटा कशासाठी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कमला नेहरू रुग्णालयातील सेंटर बंद असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त झाल्याने महापालिकेने संबंधितांना नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या सात रुग्णालयांमध्ये मिळून 62 डायलिसिस मशिन आहेत. त्यातील 12 मशिन फक्त कमला नेहरू रुग्णालयात आहेत. कोथरूड येथील केळेवाडीतील कै. सुंदराबाई गणपत राऊत दवाखान्यातील 10 बेडचे डायलिसिस सेंटर चालवण्या संदर्भातील निविदा महापालिकेने सोमवारी प्रसिद्ध केली आहे.

हे सेंटर दहा वर्षांसाठी चालवायला देण्यासंदर्भात यात नमूद करण्यात आले आहे. सरकारी दर 1200 रुपये आहे, तर महापालिकेचा दर 400 रुपये आहे. त्यामुळे नव्या निविदेला प्रतिसाद मिळेल की नाही, याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, चंदूमामा सोनवणे हॉस्पिटल, शिवरकर दवाखाना, बारटक्के दवाखाना, थोरवे दवाखाना, मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह या सात दवाखान्यांमध्ये डायलिसिस सेंटर आहेत. कमला नेहरू रुग्णालयाशिवाय इतर ठिकाणी सेंटर व्यवस्थित सुरू आहेत. केळेवाडीतील राऊत दवाखान्यातील सेंटरची मुदत संपल्याने नवी निविदा काढण्यात आली आहे.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

हे ही वाचा :

सांगली : टोल नाक्यातील शेडवर एसटी आदळली; 25 प्रवाशी जखमी

कोल्हापूर : सौरऊर्जेवर स्वच्छ होणार थेट पाईपलाईनचे पाणी

Back to top button