पिंपरी : पिंपळे गुरवच्या भाजी मंडईला मुहूर्त मिळेना | पुढारी

पिंपरी : पिंपळे गुरवच्या भाजी मंडईला मुहूर्त मिळेना

पिंपळे गुरव : पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवण्यामध्ये मध्यवर्ती भाजी मंडईसाठी सर्व्हे 72 अंतर्गत आरक्षित जागा बस स्थानक शेजारी देण्यात आली होती. या जागेत पिंपळे गुरव रिटेल मार्केट आणि भाजी मंडईचे महापालिकाकडून नियोजन करण्यात आले होते. मात्र, पालिका प्रशासनकडून यावर अंमलबजावणी न झाल्याने अद्याप पिंपळे गुरवमधील भाजी मंडईचा प्रश्न रखडलेलाच आहे. सर्व्हे 72 अंतर्गत आरक्षित भाजी मंडईची जागा 2016-17 दरम्यान शिरोळे यांच्याकडून हस्तातरित करून घेतली होती. 15 टक्के जागेत महापालिका भाजी आणि रिटेल मार्केटचे बांधकाम करणार होते. उरलेले बिल्डरकडून बांधकाम होणार होते. परंतु, इतकी वर्ष महापालिकेकडून कामाची कोणतीही हालचाल होत नसल्याने सर्व्हे 72 अंतर्गत आरक्षित भाजी मंडईची जागा पडीक अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. सध्या या भागात गाड्यांचे पार्किंग आणि जत्रा भरताना दिसत आहे.

जागेअभावी विक्रेत्यांची कुंचाबणा
दर रविवारी जिजामाता उद्याना शेजारी आठवडे बाजार भरत असला तरी स्थानिक भाजी विक्रेत्यांची मात्र जागेअभावी कुंचाबणा होत आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. अतिक्रमण कारवाईत काही वेळा विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. सृष्टी चौक शेजारील कै. बटूराव गेनुजी जगताप क्रीडा उद्याना शेजारील जागेत सुदर्शननगर, जवळकरनगर, सिंहगड कॉलनी, कल्पतरू, काशीद पार्क परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी भाजी मंडईसाठी तातपुरत्या जागा देण्यात आली होती. परंतु, स्थानिक ग्राहकांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे भाजी विक्रेत्यांच्या पुन्हा रांगा सृष्टी चौकात लागत आहेत.

प्रशासन काळातही प्रश्न प्रलंबित
सध्या प्रशासकीय काळात आरक्षित भाजी मार्केट रखडल्याने असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. येत्या काळात महापालिकेकडून पिंपळे गुरव बस स्थानक शेजारील आरक्षित जागेत रखडलेली भाजी मंडई होणार का? हे पाहावे
लागणार आहे.

महापालिकेकडून याबाबत पाठपुरावा केला जात नसल्याने आरक्षित जागेत भाजी मंडई होत नाही. प्रशासकीय काळात कुणाचा अंकुश राहिला नसल्याने मंडईचा प्रश्न प्रलंबित आहे. महापालिकेचे अधिकारी रखडलेल्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
                                                           – राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक

Back to top button