दबाव आणून अप्रत्यक्षरीत्या आणीबाणी लादली जातेय : डॉ. बाबा आढाव | पुढारी

दबाव आणून अप्रत्यक्षरीत्या आणीबाणी लादली जातेय : डॉ. बाबा आढाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  केंद्र सरकारकडून नीतिमूल्ये पायदळी तुडवून साम, दाम, दंड, भेदाचा सर्रास वापर करीत नागरिकांवर दबाव आणून अप्रत्यक्षरित्या आणीबाणी लादली जात आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी रविवारी व्यक्त केले.
आरोग्य सेनेच्या वतीने मूल्याधिष्ठित राजकारण आणि लोकशाहीचे काय? या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. आढाव बोलत होते. ते म्हणाले, ‘घटनेतील भारत निर्माण करायचा असेल, तर आपली भूमिका स्पष्ट व रोखठोकपणे मांडली पाहिजे. त्यासाठी फक्त तुरुंगच भरले पाहिजेत, असे नाही तर सध्या घडणार्‍या घटनांविरोधात वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे रस्त्यावर उतरून उत्तर दिले पाहिजे.

सध्या शासन घरोघरी कार्यक्रम सुरू आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पगारी कार्यकर्ते घरोघर जात आहेत. संघाला कुठलेही बंधन येत नाही, पैसे कुठून येतात? हिंदूराष्ट्र करण्याचे बोलतात त्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरला जातो.’ डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, सध्याच्या स्थितीत काही माध्यमे, सीबीआय, ईडी यांसारख्या संस्थांच्या दबावाच्या कामकाजाला प्रखर विरोध केला, तर ‘तुमचाही दाभोलकर करू’ अशी आम्हाला धमकी दिली जात आहे. पंतप्रधानाबद्दल बोलल्याप्रकरणी श्रीपाल सबनीस यांना ‘मॉर्निंग वॉकला सांभाळून जा’ अशी धमकी दिली गेली, आम्ही अमर्याद दाभोलकर निर्माण करू, तुमच्या बंदुकीत तेवढ्या गोळ्या आहेत का? याचा विचार करा,’ असे विचार वैद्य यांनी मांडले.

हेही वाचा :

अजित पवारांच्या पाठीशी ताकद उभी करणार : शहराध्यक्ष दीपक मानकर

घोषित दूध दर न दिल्यास  कोणती कारवाई होणार?

 

Back to top button