मटण, मासळी, चिकनवर पुणेकरांचा ताव | पुढारी

मटण, मासळी, चिकनवर पुणेकरांचा ताव

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  आखाडातील शेवटच्या दिवशी सामिष खवय्यांनी 40 ते 45 टन मासळी, दीड ते दोन हजार बोकडांचे मटण व हजारो किलो चिकन फस्त करीत आखाड साजरा केला. अधिक मास आणि त्यानंतर येणार्‍या श्रावण मासात सामिष पदार्थ
वर्ज्य मानले जातात. त्यामुळे नागरिकांनी मटण-मासळीच्या दुकानांसमोर सकाळपासून रांगा लावल्या होत्या. दुकाने बंद होईपर्यंत अनेक ठिकाणी गर्दी असल्याचे पाहायला मिळाले.

यंदा आषाढ महिन्याची सांगता सोमवारी (दि. 17) होणार आहे. सोमवती अमावस्येला शक्यतो खवय्ये सामिष पदार्थ निषिद्ध मानतात. यंदा श्रावण हा अधिक मास असून, त्याची सुरुवात मंगळवारी (दि. 18 ) होणार आहे. याकाळात अनेक जण मांसाहार करीत नाहीत, तर काही जण नवरात्रोत्सवापर्यंत मांसाहार करीत नाही. त्यामुळे, गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीसाठी सकाळपासून खरेदीसाठी गर्दी झाली होती. तर, शहरासह उपनगरांमधील मटण, चिकन मार्केट नागरिकांच्या गर्दीने गजबजून गेले होते. मासळी बाजारात पापलेट, सुरमईसह ओले बोंबिल, कोळंबी, हलवा या मासळींना चांगली मागणी होती.

पापलेट, सुरमईचे दर तेजीत होते. मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी 20 ते 25 टन, खाडीतील मासळी 300 किलो, आंध— प्रदेशातून रहू, कतला, सीलन मासळीची एकूण मिळून 15 ते 20 टन, तसेच नदीतील मासळीची 500 ते 700 किलो आवक झाली, अशी माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तर, बोकड बाजारात दीड ते दोन हजार बोकड व हजारो किलो चिकनची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

Back to top button