पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प अडकला दिल्लीत | पुढारी

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प अडकला दिल्लीत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच ती बंद करण्यात आली. तेव्हापासून हा प्रकल्प जैसे-थे स्थितीत आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महारेल इफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉरपोरेशनच्या (महारेल) अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यात हा प्रकल्प केंद्रीय रेल्वे मंत्रालयात प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली.  पुणे-नाशिक सेमी हायस्पीड प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. परंतु मध्यंतरी महारेलने भूसंपादनाचे काम थांबवण्याचे पत्र जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. तेव्हापासून यात कोणतीही हालचाल झालेली नाही. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याची तयारी पूर्ण करून  ठेवली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सद्यस्थिती जाणून घेतली. प्रकल्पाचे काम हे केंद्रीय रेल्वे मंत्रालयात थांबलेले आहे. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
 हा प्रकल्प महारेल या स्वतंत्र कंपनीकडून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, रेल्वेमंत्र्यांनी हा प्रकल्प त्यांच्याकडे मागितला आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक शहरांना जोडणार प्रकल्प आहे. यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी तो कोणी करावा याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. मग या प्रकल्पासाठी प्रत्यक्षात जमीन अधिग्रहणाचे काम सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
हेही वाचा : 

Back to top button