पुण्यात यंदा ‘फिरत्या हौदांची’ सुविधा बंद ! गणेशोत्सवात मूर्तिदान केंद्रांची संख्या वाढवणार | पुढारी

पुण्यात यंदा ‘फिरत्या हौदांची’ सुविधा बंद ! गणेशोत्सवात मूर्तिदान केंद्रांची संख्या वाढवणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोरोना काळात ‘सोशल डिस्टसिंग’साठी गणेशोत्सवामध्ये सुरू केलेली फिरत्या हौदांची सुविधा या वर्षी बंद करण्यात येणार आहे. याऐवजी हौदांची आणि मूर्तिदान केंद्रांमध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी पुणे महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. यामध्ये प्रामुख्याने नदी व नैसर्गिक स्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन होऊ नये, यासाठी मागील काही वर्षांमध्ये कृत्रिम हौद आणि मूर्तीदान केंद्राची संकल्पना राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच गणेशोत्सव मंडळांचादेखील याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

यासोबतच निर्माल्य गोळा करण्यासाठीही कंटेनर ठेवण्यात येतात. हौदांमध्ये विसर्जित झालेल्या आणि मूर्तिदान केंद्रांवर आलेल्या मूर्ती गोळा करून वाघोली येथील खाणींमध्ये सोडण्यात येतात. मात्र, 2020 मध्ये कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने फिरत्या विसर्जन हौदाची संकल्पना राबविली होती. त्यामुळे नागरिकांना घरापर्यंत विसर्जनाची सोय झाली होती. 2021 आणि 2022 च्या गणेशोत्सवामध्येदेखील ही संकल्पना राबविण्यात आली. यंदा मात्र फिरत्या सुविधा बंद करणे आणि शहराच्या वाढत्या विस्तारानुसार तसेच जेथे अधिकची गरज असेल त्याठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार आणखी विसर्जन हौद बांधण्यासाठीआणि मूर्तिदान केंद्रांची संख्या वाढविण्याचे विचाराधीन असल्याचे महापालिकेतील उच्च पदस्थ अधिकार्‍याने सांगितले.

जिल्हा प्रशासनाकडे खाणीची मागणी
गणेश विसर्जन हौद आणि मूर्तीदान केंद्रामध्ये जमा होणार्‍या गणेश मूर्ती अंतिमत: वाघोली येथील खाणींमध्ये विसर्जित करण्यात येतात. प्रामुख्याने या खाणी खासगी मालकीच्या असून, यासाठी महापालिका खाण मालकांना पैसेही देते. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची वाघोली येथील खाण उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे.

हेही वाचा : 

सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करणाराही मेसेजमधील मजकुराला तेवढाच जबाबदार : उच्‍च न्‍यायालय

अकरावी प्रवेशासाठी कुणी विद्यार्थी देता का?

Back to top button