हवामान खात्याला महासंगणक ; केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरण रिजिजू यांची माहिती | पुढारी

हवामान खात्याला महासंगणक ; केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरण रिजिजू यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान विज्ञान विभाग आयआयटीएम) येथे मोठ्या क्षमतेचा महासंगणक व डॉप्लर रडार लवकरच देणार असल्याची माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरण रिजिजू यांनी शनिवारी (दि. 15) दिली. रिजिजू यांनी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार घेतल्यानंतर प्रथमच पुणे शहरात पाषाण भागातील ‘आयआयटीएम’ला भेट दिली व कामाचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी तेथेच पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, हवामानाचे मॉडेल अधिक सक्षम व अचूक करण्यासाठी पुणे आयआयटीएमला ज्यादा क्षमतेचा महासंगणक (सुपर कॉम्प्युटर) लवकरच देण्यात येईल. या ठिकाणी सध्या 4 प्लॉप (फ्लोटिंग पॉईंट ऑपरेशन पर सेकंद) इतक्या क्षमतेचा महासंगणक आहे.आता दुसरा 10 फ्लॉप इतक्या क्षमतेचा महासंगणक दिला जाणार आहे. त्यामुळे हवामानाचे मॉडेल अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

पुणे, छत्रपती संभाजीनगरला रडार
महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अधिक अचूक देण्यासाठी पुणे व छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांत डॉप्लर रडार बसवण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन व पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘या दोन्ही शहरांत लवकरच डॉप्लर रडार बसवण्यात येणार आहे. त्यासाठी खूप मोठी जागा लागते. त्याची निश्चिती करण्याचे काम सुरू आहे.’

उत्तर व दक्षिण ध्रुवांवर भारतीय अभ्यास केंद्र
उत्तर व दक्षिण ध्रुव अर्थात आर्टिक व अंटार्टिका येथील हवामानाचे हिमालयातील हवामानाशी साधर्म्य आहे. त्यामुळे त्या दोन्ही ध—ुवांवर भारतीय संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तेथे मी नुकतीच भेट दिली. त्या अभ्यासाचा फायदा आपल्या हवामान शास्त्रज्ञांना होईल, असेही रिजिजू यांनी सांगितले.

विज्ञानाच्या बातम्या महत्त्वाच्या
रिजिजू यांनी पुणे आयआयटीएम व आयएमडीची प्रशंसा केली. ‘मसाला न्यूजपेक्षा मला विज्ञानाच्या बातम्या अधिक आवडतात. त्या दिल्याने लोकांच्या ज्ञानात भर पडते,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी पुणे आयआयटीएमचे संचालक डॉ. कृष्णन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर उपस्थित होते.

हेही वाचा : 

खातेवाटपाप्रमाणेच मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच: उपमुख्यमंत्री फडणवीस   

Murder : मासे कापण्याच्या सुरीने मित्रानेच केला मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून लावली विल्हेवाट

Back to top button