पिंपरी-चिंचवड पोलिसांना प्रतीक्षा डॉग स्कॉडची

पिंपरी-चिंचवड पोलिसांना प्रतीक्षा डॉग स्कॉडची
Published on: 
Updated on: 

संतोष शिंदे :

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरासाठी पाच वर्षांपूर्वी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. मात्र, येथील पोलिस अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडताना दिसत आहेत. गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या श्वानपथकालादेखील अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ज्यामुळे एखादी गंभीर घटना घडल्यानंतर तसेच, व्हीआयपी दौर्‍यादरम्यान येथील पोलिसांना पुणे पोलिसांवर अवलंबून राहावे लागत आहे.

पाठपुरावा सुरूच..
पिंपरी-चिंचवड परिसरासाठी पाच वर्षांपूर्वी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर येथे आलेल्या प्रत्येक पोलिस आयुक्तांनी मनुष्यबळासह साधनसामग्रीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. सध्याचे आयुक्त विनयकुमार चौबे यांचादेखील शासनाकडे विविध पथके कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

वाहने आणि पदे मंजूर
विनयकुमार चौबे यांनी पोलिस आयुक्त म्हणून शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा नियोजन फंडातून 18 चारचाकी वाहने मिळविली. तसेच, एक अतिरिक्त आयुक्त (उपमहानिरीक्षक दर्जा), दोन उपायुक्त अशी पदे मंजूर करून घेतली आहेत.

तीर्थक्षेत्रांमुळे सुरक्षेचा प्रश्न
पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात देहू आणि आळंदी ही दोन्ही तीर्थक्षेत्रे येतात. देहू-आळंदी येथून पालख्यांचे प्रस्थान होते. त्या वेळी देहू-आळंदी परिसरात वारकरी मोठ्या संख्येने जमा होतात. भाविकांच्या सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना डोळ्यात तेल घालून खडा पहारा द्यावा लागतो. अशा प्रकारच्या सोहळ्यात बॉम्बशोधक-नाशक पथक आणि डॉग स्कॉडचीदेखील मोठी आवश्यकता असते. मात्र, दरवेळी पिंपरी- चिंचवड पोलिसांना ग्रामीण किंवा पुणे शहर पोलिसांकडून ही दोन्ही पथके येईपर्यंत वाट बघावी लागते.

दौर्‍यात बदल झाल्यास पळापळ
शहरात आलेले व्हीआयपी अचानक आपल्या दौर्‍यात बदल करीत असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला भेट दिली. नियोजित दौर्‍याव्यतिरिक्त ही भेट असल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली. पुणे शहर पोलिसांचे बॉम्बशोधक-नाशक पथक आणि डॉग स्कॉड येऊन परिसराची पाहणी होईपर्यंत सगळे पोलिस अधिकारी तणावात होते.

सत्तांतर नाट्यानंतर दौरे वाढले
राज्यात सत्तांतराचे नाट्य सुरूच आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडमध्ये महिन्यातून एकदा तरी राज्याची किंवा केंद्राची सुरक्षा असलेल्या नेत्यांची भेट असते. राजकीय नेते आले की, त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना वरील दोन्ही पथकांची गरज भासत असल्याने नेत्यांच्या सुरक्षेत कमी राहू नये, यासाठी पोलिसांची धांदल उडत आहे.

राजकीय पुढार्‍यांचे दुर्लक्ष
मागील पाच वर्षात सर्वच राजकीय पक्षांकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणार्‍या आणि पोलिसांना लागणार्‍या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

खुनाच्या गुन्ह्यात डॉग स्कॉड महत्त्वाचे
शहर परिसरात वरचेवर खुनाचे प्रकार घडत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढताना डॉग स्कॉड हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पाच वर्षात शहरात शेकडो खुनाच्या घटना घडल्या आहेत. या खुनांची कारणे वैयक्तिक ते आर्थिक वादापासून राजकीय वादापर्यंतची आहेत. याचा तपास करताना पिंपरी-चिंचवड पोलिसांना पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून किंवा रेल्वे पोलिसांकडून पथक आल्यानंतर तांत्रिक तपासाला सुरुवात करावी लागत आहे.

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात बॉम्बशोधक/ नाशक पथक तसेच, डॉग स्कॉड अद्याप कार्यान्वित केलेले नाही. या पथकांसाठी पोलिस आयुक्तालय कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ही पथके कार्यान्वित होतील.
                – भास्कर डेरे, सहायक पोलिस आयुक्त, (प्रशासन) पिंपरी- चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news