हिमालयात मान्सून स्थिर, तरीही पावसाचा जोर वाढेना! | पुढारी

हिमालयात मान्सून स्थिर, तरीही पावसाचा जोर वाढेना!

पुणे, पुढारी वृत्तसेवा : मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी यंदा विलंबाने स्थिर झाला आहे, तरीही महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर कमी आहे. कारण पश्चिमी वार्‍याचा वेग राज्यात कमी झाल्याने उत्तर भारतातून खाली पाऊस येण्यात अडचणी येत आहेत.

यंदा जुलैचा दुसरा आठवडा उलटला, तरीही राज्यात मान्सून पुरेशा वेगाने बरसलेला नाही. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर खूपच कमी आहे. बंगालच्या उपसागरातून मान्सून दोन प्रवाह घेऊन निघतो. पहिला प्रवाह केरळ मार्गे देशात येतो. तो कोकणातून पुढे जातो. दुसरा प्रवाह बंगालच्या उपसागरातून थेट पश्चिम बंगाल, बिहार मार्गे उत्तर प्रदेशात जातो. हे दोन्ही प्रवाह मध्य भारतात एकत्र होतात व मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर होतो. पश्चिमी वारे हिमालय पार करते. त्या वेळी मान्सून त्याच्या पाथ्याशी स्थिर होऊन देशभरात चांगला पाऊस पडतो.

राज्यात का आहे जोर कमी?

मान्सूनची पहिली शाखा अरबी समुद्रामार्गे केरळपर्यंत 8 जून रोजी आली. मात्र, ती रत्नागिरीत सुमारे 20 दिवस अडखळली. वार्‍याचा वेग कमी असल्याने असे झाले. मात्र, बंगालच्या उपसागरातून मान्सूनची दुसरी शाखा 15 जूनच्या सुमारास विदर्भातून सक्रिय झाली. या दोन्ही शाखा एकत्र झाल्या अन् मान्सून उत्तर भारतात वेगाने गेला. मात्र, महाराष्ट्रात पश्चिमी वार्‍याचा वेग कमी झाला. त्यामुळे येथे मान्सूनचा जोर कमी झाल्याने कोकण वगळता उर्वरित राज्यात खूप कमी पाऊस आहे.

Back to top button