बाप रे ! घरात चोरटा तर राहत नाही ना? भाड्याने घर देताना खबरदारी घेण्याची गरज

बाप रे ! घरात चोरटा तर राहत नाही ना? भाड्याने घर देताना खबरदारी घेण्याची गरज

संतोष शिंदे :

पिंपरी : डांगे चौक येथील बँक फोडण्याचा प्रयत्न करणारे चोरटे बाजूच्याच एका खोलीत भाड्याने राहत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यातील विशेष बाब म्हणजे घरमालकाने संबंधित भाडेकरूची कोणतीही नोंद घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी घरमालकावर थेट गुन्हा दाखल केला आहे. शहर परिसरात असे अनेक नोंद नसलेले भाडेकरू राहत आहेत. त्यामुळे तुमच्याही घरात चोरटे तर राहत नाहीत ना, याबाबत खातरजमा करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत डांगे चौक येथे चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून बँक फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिस तपासात आरोपी बँकेच्या शेजारी असलेल्या खोलीत राहत असल्याचे समोर आले. मागील पंधरा दिवसांपासून चोरटे बँकेची रेकी करीत होते. चोरट्यांनी केलेल्या मायक्रो प्लॅनिंगमुळे पोलिसही अवाक् झाले आहेत. या घटनेची पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे. यापुढे घर किंवा दुकान भाडेतत्त्वावर दिल्यानंतर त्याची नोंद पोलिस ठाण्यात न करणार्‍या मालकांना आता कारागृहाची हवा खावी लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. घरमालक व भाडेकरूंनी तत्काळ ही नोंद करावी, असे आवाहन सहपोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

नागरिकांचा अल्प प्रतिसाद
शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना भाडेकरूंची नोंद करावी, असे आवाहन यापूर्वी पोलिसांकडून केले होते. मात्र, मागील काही वर्षांपासून या आवाहनाला नागरिकांचा योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे गंभीर घटनांच्या तपासातून उघड झाले आहे.

कारवाई निश्चित
यापुढे भाडेकरूंची नोंद न करणार्‍या घरमालकांवर तसेच माहिती न देता भाडेतत्त्वावर घर किंवा दुकान घेणार्‍यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. तसे आदेश उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना दिले आहेत. त्यानुसार, तपास पथकाचे अधिकारी-कर्मचारीदेखील शहरात फिरून याची माहिती संकलित
करीत आहेत.

दहशतवादी घटनांमध्येही सहभाग
दहशतवादी घटनांमध्ये सहभागाच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या आठ जणांनी पिंपरी- चिंचवडमध्ये भाडेतत्त्वावर घर घेतल्याचे यापूर्वी समोर आले आहे. त्या वेळीदेखील संबंधित मालकाने घराजवळील पोलिस ठाण्यात त्याची नोंद केलेली नव्हती. दिल्ली स्पेशल सेलने देशाच्या सीमेवरून केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेले संशयितदेखील पिंपरी-चिंचवडमध्ये राहत होते. त्यांचा पुण्यातील जंगली महाराज साखळी बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे त्या वेळी सांगण्यात आले. तब्बल 30 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा नक्षली कमांडर तळेगाव दाभाडे येथे राहत होता. महिला कमांडरच्या संपर्कात असलेल्या एका तरुणीचे वास्तव्य भोसरी येथे असल्याचे पुणे दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले होते. यानंतरही पोलिसांनी वारंवार आवाहन करून शहरातील भाडेकरूंची नोंद होत नसल्याचे चित्र आहे. फ

ऑनलाईनही करू शकता नोंदणी
भाडेकरू नोंद करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या www.pcpc.gov.in या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे. त्यावर क्लिक करून पुढील प्रक्रिया करता येते. तसेच, ज्यांना इंटरनेट वापर शक्य नाही, त्यांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात जाऊन एक फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यासाठी भाडेकरू व घरमालकाचे फोटो, सरकारी ओळखपत्र आदींची गरज लागते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news