उंडवडी : पुढारी वृत्तसेवा : उंडवडी क. प. ते फलटण रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. या रस्त्याचे काम काही ठिकाणी सुरू झाले आहे. मात्र, या रस्त्याच्या कामात दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या हजारो झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळे वृक्षप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. झाडे तुटणार असल्याने पर्यावरणाचा र्हास तर होणारच आहे, शिवाय या झाडांवर वास्तव्य करणारे हजारो पशू-पक्षी बेघर होणार आहेत, याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
पाटस ते उंडवडी सुपेमार्गे एमआयडीसीला जाणार्या पालखी महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे आहे. याही रस्त्यावरील हजारोंच्या संख्येने झाडे तोडण्यात आल्याने रस्ता उजाड झाला आहे. आता उंडवडी क.प. ते फलटण रस्त्यावरील झाडेही तोडली जाणार आहेत.
रस्ता जरी चांगला होत असला तरी हजारोंच्या संख्येने पशू-पक्षी बेघर होणार आहेत. या वृक्षतोडीचा भविष्यात मोठा दुष्परिणाम होणार असल्याचे मत वृक्षप्रेमींनी व्यक्त केले आहे.