छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्याला महाडमधून बेड्या | पुढारी

छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्याला महाडमधून बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना ‘मला मारण्याची सुपारी मिळाली आहे,’ असे म्हणत फोन करणार्‍या एकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने महाड येथील लॉजमधून अटक केली.
प्रशांत दशरथ पाटील (कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबत भुजबळ यांचे स्वीय सहायक संतोष गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत पाटील हा बारावी शिकला असून, तो पुण्यातील तुळापूर येथील एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करतो. छगन भुजबळ सोमवारी पुण्यात असताना त्यांचा स्वीय सहायक गायकवाड यांना मोबाइलवर फोन आला.

फोन करणार्‍या व्यक्तीने हा ‘भुजबळांचा नंबर आहे का ?’ अशी विचारणा करीत ‘मला त्यांना जिवे मारण्याची सुपारी मिळाली,’ असे सांगितले. त्यावर गायकवाड यांनी त्याला नाव विचारले असता, त्याने आपले नाव प्रशांत पाटील असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने ’मी सांगून काम करतो’, म्हणत भुजबळांना जिवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तत्काळ या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाइल नंबरच्या आधारे पथकाचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांना प्रशांत पाटील हा रायगड येथे असल्याचे समजले.

त्यानंतर पथकातील पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव, हवालदार संजय भापकर, सयाजी चव्हाण, पोलिस नाईक राजेंद्र लांडगे हे रायगड येथे रवाना झाले. त्याला महाड येथून अटक केली. प्रशांत पाटील याने मंत्री भुजबळ यांच्याबरोबरच मंत्री धनंजय मुंडे यांनादेखील फोन करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने या दोघांचे नंबर ऑनलाईन शोधून त्यांना कॉल केला. मंत्री वळसे पाटील यांनादेखील तो कॉल करणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांना जिवे मारण्याची धमकीप्रकरणी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पवार कुटुंबीय असे करणे शक्य नाही : भुजबळ
‘अशा प्रकारे धमकी देण्याचे प्रकार पवार कुटुंबीय कधीही करीत नाहीत. शरद पवार तर अजिबातच करीत नाहीत ते वैचारिक लढाई करीत असतात. हा प्रकार उत्साहाच्या भरात काही कार्यकर्त्यांनी केला असावा. त्यातूनच ही घटना घडली. पोलिस आता त्यांचे काम करीत आहेत,’ अशी माहिती राज्याचे नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. भुजबळ हे सोमवारी शहरात महात्मा फुले वाड्यात आले असता मुक्कामी थांबले होते. मंगळवारी सकाळी त्यांना आलेल्या धमकीच्या फोनबाबत पत्रकारांनी ‘तुम्हाला आलेल्या धमकीत पवार कुटुंबीयांचा हात आहे का…’ असा प्रश्न केला.

यावर त्यांनी थेट पवार कुटुंबीयांची बाजू घेत त्यांच्याकडून असे होऊच शकत नाही, असे म्हणत सांगितले की, ‘आमच्या शपथविधीनंतर उत्साही कार्यकर्त्यांकडून असे प्रकार घडत असतात. आम्ही अशा प्रकारांकडे लक्षही देत नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, शपथविधी झाला असला तरीही खाते वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या आहेत. लवकरच खाते वाटप होऊन नवनिर्वाचित मंत्र्यांना पदभार सोपवला जाईल.’

हे ही वाचा :

सातारा : पिंपोडे बुद्रुक येथे कृषी औषधे-खताच्या दुकानाला आग; लाखो रूपयांचे नुकसान

Kedarnath Dham Yatra : मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित

Back to top button