बारामतीत चर्चा पार्थ यांचीच !

बारामतीत चर्चा पार्थ यांचीच !
Published on: 
Updated on: 

सुहास जगताप : 

पुणे : 'उपमुख्यमंत्री अजित पवार हे चिरंजीव पार्थ यांना खा. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात उभे करणार नाहीत,' असे अजित पवारांचे पुतणे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले असले, तरी मतदारसंघात चर्चा मात्र पार्थ पवार यांचीच आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांची खरी लढाई बारामती लोकसभेच्याच रणांगणात लढली जाईल, असा अनेकांचा अंदाज आहे.

बारामती मतदारसंघात आता विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे फारसे स्थानिक नेते, कार्यकर्ते राहिलेले नाहीत. बहुतेक सर्वच अजित पवार यांच्या गटात गेलेले असल्याने आता पार्थ पवार हेच बारामतीतून सुळे यांच्याविरोधात लढतील, अशी जोरदार चर्चा खडकवासला ते इंदापूर आणि भोर ते दौंड, अशा सर्वच भागांत आहे. पार्थ यांना खुले मैदान मिळाले असल्याने ते षटकार ठोकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी संधी असूनही पार्थ यांना खासदार करण्यात किंवा त्यांना राजकारणात स्थिर करण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कधी फारसा रस दाखविला नाही. उलट पार्थ यांच्या एका विधानावर मआमच्या घरात त्यांच्या मताला काडीची किंमत नाही, असे म्हटले होते, त्यामुळे अजित पवार आणि त्यांचे कुटुंब आता सुळे यांना सहानुभूती दाखवतील का? आणि त्यांनी दाखविल्यास भाजपवाले त्यांना तसे करू देतील का? असे रोखठोक विश्लेषण एका कार्यकर्त्याने बोलून दाखविले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार अजित पवार आणि त्यांचे कट्टर समर्थक आमदार दत्तात्रय भरणे हे आता तरी सुळे यांच्यापासून वेगळे आहेत. अजित पवार यांच्या नियोजन आणि राजकीय जुळणीवरच सुळे यांची आजपर्यंत भिस्त होती, यामुळे त्यांनी मतदारसंघात स्वत:चे असे कार्यकर्तेच तयार केले नाहीत. जे होते ते पहिल्याच फटक्यात अजित पवार यांच्या बाजूला गेल्याने आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अतिशय तुरळक कार्यकर्ते सुळे यांच्या पाठीशी राहिले आहेत. मतदारसंघातील या राजकीय स्थितीमुळे पार्थ पवार यांना बारामतीसारखा सुरक्षित मतदारसंघ आता राज्यात शोधून सापडणार नाही, अशी स्थिती तयार झाली आहे. मावळ मतदारसंघात विद्यमान शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी कापून तेथे पार्थ यांची वर्णी लावण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा अजित पवार हेसुध्दा पार्थसाठी बारामतीलाच पसंती देतील, असेही काही कार्यकर्त्यांनी चर्चेत सांगितले.

अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातील राजकीय लढाई आगामी काळात कोणते वळण घेते, यावर देखील बारामती लोकसभा मतदारसंघातील गणिते अवलंबून आहेत. शरद पवार यांनी राज्यभर दौरे करून तसेच आपल्या राजकीय डावांनी अजित पवार यांना पेचात अडकविण्याचा प्रयत्न जोरदारपणे केल्यास अजित पवार बारामतीत शरद पवार यांची कोंडी करतील, असा अनेकांचा अंदाज आहे. अजित पवार आणि भाजप यांची, शरद पवार हे जास्तीत जास्त बारामतीतच अडकून राहावेत अशी व्यूहरचना आहे. त्यातूनही या मतदारसंघात पार्थ पवार हेच योग्य उमेदवार ठरतील, असे अनेकांना वाटते.

पार्थ नसले, तरी स्थिती अवघड
पार्थ पवार यांना बारामतीतून उमेदवारी मिळाली नाही, तरी खा. सुळे यांच्यासमोरील अडचणी संपणार नाहीत. राजकीय स्थिती कठीणच असणार आहे. शिवसेनेचे 'फायरब्रॅंड' नेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे, त्यांना अजित पवार यांची साथ मिळाल्यास सुळे यांना निवडणूक जिंकणे दुरापास्त होणार आहे. गेल्या वेळी सुळे यांच्याविरोधात लढलेल्या आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना उमेदवारी मिळाली, तरी सुप्रिया सुळे अडचणीतच राहणार आहेत. अजित पवार आता सुळे यांच्याविरोधात असल्याने आणि शरद पवार यांना बारामतीत अडकवून ठेवण्याची रणनीती असल्याने सुळे यांच्यासमोर अडचणींचा डोंगर आहे.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news