विमानतळाच्या संरक्षित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा ; हवाई दलाचे महापालिकेला पत्र | पुढारी

विमानतळाच्या संरक्षित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा ; हवाई दलाचे महापालिकेला पत्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लोहगाव विमानतळाच्या संरक्षित क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांकडे आता हवाई दलाने लक्ष वेधले आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे येथील बॉम्ब यार्डसह विमानतळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यावर कारवाई करावी, असे हवाई दलाने महापालिकेला कळविले आहे. लोहगाव विमानतळ हे हवाई दलाच्या अखत्यारित येते. या विमानतळापासून शंभर ते नऊशे मीटरपर्यंतच्या परिसरात बांधकामांवर निर्बंध आहेत. असे असताना नगर रस्त्यालगत असलेल्या लोहगाव सर्व्हे नं. 90, 133, 135 व 136 या भागातील फॉरेस्ट पार्क परिसरात अनधिकृतपणे प्लॉटिंग करून अनधिकृत बांधकामे गेल्या वर्षभरात सुरू झाली आहेत. हा संपूर्ण परिसर लोहगाव विमानतळाच्या बॉम्ब यार्डपासूनच्या नऊशे मीटरच्या परिसरात येतो. या ठिकाणी वृक्ष लावण्यासही परवानगी नसताना प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दै. ’पुढारी’ने या अनधिकृत बांधकामांकडे लक्ष वेधले आहे. आता नव्याने पुन्हा या ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे वृत्त
दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता हवाई दलानेही महापालिकेचे लक्ष वेधले आहे. हवाई दलाचे मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या विंग कमांडर यांनी याबाबत पालिका आयुक्तांना पत्र पाठवून या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, असे कळविले आहे. दरम्यान, पालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता यांनी या ठिकाणी पाहणी करून संबंधित बांधकामांना नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे यांनी सांगितले.

नाले पूर्ववत कधी होणार?
फॉरेस्ट पार्क परिसरातून मोठा नैसर्गिक नाला अनेक वर्षांपासून वाहत होता. मात्र, अनधिकृत प्लॉटिंग करताना संबंधितांनी हा नालाच बुजवून टाकला आहे. त्याऐवजी येथील रस्त्याच्या खाली बंद पाइप टाकून या नाल्याचा प्रवाह वळविण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही पालिका प्रशासनाने त्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही.

 

Back to top button