दगडाच्या खाणीत पोहण्यास गेलेल्या दोघांचा मृत्यू

दगडाच्या खाणीत पोहण्यास गेलेल्या दोघांचा मृत्यू

लोणावळा: पुढारी वृत्तसेवा :  आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत लोणावळ्यात वर्षाविहारसाठी आलेल्या मुंबईतील दोन तरुणांचा लोणावळ्याजवळील वरसोली गावच्या हद्दीतील एका दगडाच्या खाणीत पोहण्यास गेले असता बुडून मृत्यू झाला. तर बुडणार्‍या एका तरुणीला त्यांच्या मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने वाचविले. ही घटना शनिवारी (दि. 8) सायंकाळी सातच्या सुमारास लोणावळ्या जवळील वरसोली गावच्या हद्दीत घडली. प्रियांक पानचंद व्होरा (35, रा. पवई, मुंबई), विजय सुभाष यादव (35, रा. घाटकोपर, मुंबई) असे दगडाच्या खाणीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर झेनिया वियागत (29, रा. मुलूंड, ठाणे) या तरुणीला वाचविण्यात यश आले आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांक, विजय, झेनिया आणि इतर तीन जण असे एकूण सहा मित्र शनिवारी दुपारनंतर लोणावळ्यात वर्षाविहाराला आले होते. त्यांनी वरसोली येथे एक बंगला भाड्याने घेतला होता. सायंकाळी ते सर्वजण बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराच्या पायथ्या जवळील एका दगडाच्या खाणीकडे फिरायला गेले होते. त्या ठिकाणी ते या खाणीतील पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा जागीच बुडून मृत्यू झाला. हे सर्व मित्र- मैत्रिणी मुंबईतील एका फायनान्स कंपनीत कामाला आहेत.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करत बुडालेल्या दोघांना त्यांचे मित्र व स्थानिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मागदर्शनाखाली सुरू आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news