पुणे : ‘बीएस्सी नर्सिंग’साठी प्रवेशप्रक्रिया सुरू | पुढारी

पुणे : ‘बीएस्सी नर्सिंग’साठी प्रवेशप्रक्रिया सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली. सीईटी सेलकडून यंदा बीएस्सी नर्सिंगची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार सीईटी सेलकडून सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 28 जून रोजी जाहीर करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

मात्र, प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत नसल्याने, अनेक विद्यार्थी प्रतीक्षेत होते. अखेर सीईटी सेलने नोंदणी करण्यासोबतच अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची; तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलैपर्यंत पूर्ण करता येणार आहे.

या प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क हे विद्यार्थ्यांना 16 जुलैपर्यंत भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखले हे स्कॅन करून ते पीडीएफ फाइलमध्ये 18 जुलैपर्यंत अपलोड करावे लागणार आहेत. यादरम्यान कादगपत्रांची पडताळणी सुरू राहणार आहे. या पडताळणीची अंतिम तारीख 19 जुलैपर्यंत राहणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर 21 जुलैला गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती वारभुवन यांनी दिली.

ऑनलाइन अर्जासाठी 15 जुलैपर्यंत मुदत

प्रवेशासाठी चुरस…
बीएस्सी नर्सिंगनंतर रोजगाराच्या चांगल्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणाच्याही संधी आहेत. महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमतेच्या तुलनेत प्रवेशासाठी येणार्‍या अर्जांची संख्या अडीचपट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा

आयटीपेक्षा आयटीआयचे विद्यार्थी भारी ! विद्यार्थ्यांना 29 लाखांचे पॅकेज

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; पंचगंगेची पातळी 21 फुटांवर 

कोल्हापूर : कोयना एक्स्प्रेस, 4 पॅसेंजर आज रद्द

Back to top button