भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य ; औंध शासकीय रुग्णालयाकडे जाताना दुर्गंधीचा त्रास | पुढारी

भुयारी मार्गात घाणीचे साम्राज्य ; औंध शासकीय रुग्णालयाकडे जाताना दुर्गंधीचा त्रास

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : औंध शासकीय रुग्णालयाजवळील पादचारी भुयारी मार्गात घाणीचे साम—ाज्य पसरले आहे. तसेच, अनेक दारूच्या बाटल्या पडल्यामुळे भुयारी मार्ग तळीरामाचा अड्डा बनत असल्याने दिसत आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे औंध शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेश द्वारालागून असलेल्या भुयारी मार्गाची अत्यंत दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. भुयारी मार्गात दुर्गंधीमुळे नागरिकांना नाकाला रुमाल लावून जावे लागते. भुयारी मार्गात दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. रात्री तळीरामाचा अड्डा भरत असल्याने दारूच्या बाटल्या सर्वत्र पसरल्याचे दिसून येते.

कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
याच भुयारी मार्गाचा वापर ज्येष्ठ नागरिक व महिला औंध रुग्णालयाकडे जाण्याकरिता करतात. या भुयारी मार्गात दुर्गंधी, दारूच्या बाटल्यांचा खच, आणि विद्युत व्यवस्था नसल्याने नागरिकांना ये-जा करताना भीती वाटत आहे. पिंपरी-चिंचवड भागात बीआरटी मार्ग असल्याने पादचारी सर्रास भुयारी मार्गाचा वापर करतात. त्यामुळे लवकरात लवकर भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्याची तसेच तळीरामांवर कारवाइ करण्याची मागणी केली जात आहे.

Back to top button