कोंडीमुळे गुदमरला पिंपळे गुरव येथील चौकांचा श्वास  | पुढारी

कोंडीमुळे गुदमरला पिंपळे गुरव येथील चौकांचा श्वास 

 नवी सांगवी : पिंपळे गुरव, सांगवी येथील मुख्य चौकात रस्त्याच्या चारही बाजूला अतिक्रमण होत आहे. तसेच, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लागत आहेत. परिणामी येथे दिवसेंदिवस खाऊगल्ली निर्माण झाली आहे. त्यातच चौकात सिग्नल यंत्रणा नाही. रस्त्यावरच बाजार भरत असल्यामुळे संध्याकाळच्या सुमारास परिसरात वाहतूककोंडी होत आहे.
अतिक्रमणामुळे कोंडीत भर 
पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील काटेपुरम चौक, कृष्णा चौक, साई चौक, डायनासोर गार्डन चौक, रामकृष्ण चौक, सृष्टी चौक, तुळजाभवानी मंदिर, कल्पतरू चौक या मुख्य चौकात पिंपरी, चिंचवड, भोसरी, खडकी, दापोडी, शिवाजीनगर, औंध, राहटणी काळेवाडी आदी भागातून ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या जास्त असते. स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण झालेल्या पिंपळे गुरव, सांगवी परिसरातील रस्ते मोठे करण्यात आले आहेत. रस्त्यांची स्थिती चांगली आहे. परंतु, अतिक्रमणामुळे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे वाहतूककोंडी होत आहे. या परिसरात सिग्नल यंत्रणा नाही. त्यामुळे वाहतूककोंडीत दिवसेंदिवस भरत पडत चालली आहे.
काटेपुरम चौकात वाहनांच्या रांगा 
येथील काटेपुरम चौकात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास वाहतूककोंडी निर्माण झाली होती. या वेळी वाहतूक पोलिस नसल्याने बराच वेळ कोंडी सुटता सुटेना. चारही दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळाने सांगवी पोलिस ठाण्यातील बिट मार्शल पोलिस हंसराज गोरे व त्यांचे सहकारी येथील चौकातून पेट्रोलिंग करीत होते. वाहतूक कोंडीच्या परिस्थतीचे गांभीर्य लक्षात घेत चौकात उभे राहून त्यांनी वाहतूक सुरळीत केली.
अपघाताची भीती 
पावसाळ्याचे दिवस सुरू असताना वाहतूककोंडीमुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येथे महापालिका प्रशासन तसेच सांगवी वाहतूक विभागाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. येथील मुख्य चौकातून पीएमपी बस, खासगी बस यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर उभे राहतात. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने देखील ये-जा करीत असतात. त्यामुळे येथे वाहतूक पोलिस आणि सिग्नल यंत्रणा असणे आवश्यक आहे. येथील परिसराचा गेल्या दोन-तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. त्यामुळे लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढली आहे. शहरातील रस्ते मोठे करण्यात आले आहेत. परंतु, अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतुकीमुळे येथील परिसरात वाहतूककोंडी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
चौकात सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे संध्याकाळी वाहतूककोंडी होते. त्यामुळे सर्वच वाहनचालक हॉर्न वाजवत असल्यामुळे परिसरात कर्कश आवाज होतो. परिणामी या परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांना याचा नाहक त्रास होत आहे.
                                                                                 – दीप्ती कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या 

Back to top button