

वडगाव मावळ : मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात येणार्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती, सुरळीत विद्युतपुरवठा तसेच वाहतूककोंडी याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी
केली आहे. यासंदर्भात खासदार बारणे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. मावळ तालुक्यात लोणावळा, अंदर मावळ, नाणे मावळ व पवन मावळ व विविध भागात पर्यटक मोठया प्रमाणावर येत असतात. वर्षाविहार व धार्मिकस्थळ यांना भेट देण्यासाठी लोणावळा विभागात भुशी डॅम येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येतात.
खड्ड्यांमुळे पर्यटकांना त्रास
प्रामुख्याने वाहतुकीच्या समस्येमुळे स्थानिक रहिवाशी व पर्यटकांना त्रास होतो. तसेच, अंदर मावळमध्ये टाकवे वडेश्वर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशी यांना व येणार्या पर्यटकांना जा-ये साठी खड्डेमय रस्तातून जावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होण्याची शक्यता आहे. नाणे मावळमधील वडिवळे पुलाचे काम सुरू असून पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी, कामगार व विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागत आहे. कार्ला एकवीरा देवींच्या दर्शनासाठी येणाच्या भाविकांची संख्या पाहता गडावर अपघात होऊ नये तसेच स्थानिक रहिवाशी यांना पार्किंग व वाहतूकबाबत ग्रामस्थांशी बोलून मार्ग काढण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केल्या आहेत.
लोहगडला जाणारे शिवभक्त यांना येणार्या समस्यांबाबत उपाय योजना कराव्या, पावसाळ्यात विद्युत पुरवठ्याची समस्या मोठया प्रमाणात असून, याबाबत अनेक तक्रारी आहे. अशा सर्व समस्यांबाबत सर्व शासकीय संबधित खाते प्रमुख यांना याबाबत सूचना करून त्वरित उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार बारणे यांनी केल्या आहेत.