भेसळयुक्त खव्याचे राज्यात ठिकठिकाणी अड्डे - पुढारी

भेसळयुक्त खव्याचे राज्यात ठिकठिकाणी अड्डे

गुजरातच्या बर्फीचीदेखील राज्यात चलती

पुणे : अशोक मोराळे : सणासुदीच्या काळात बर्फी, मोदक, मिठाईला मोठी मागणी असते. यातील बहुतांश खाद्यपदार्थ खव्यापासून तयार केले जातात. मात्र मागील काही वर्षांपासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खव्याची विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सात ते आठ हजार किलो भेसळयुक्त खवा राज्यात दरदिवशी विक्री केला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गुजरातमधून येणार्‍या बर्फीचा वाटा वेगळाच आहे.

आर्थिक हव्यासापोटी भेसळयुक्त खव्याची विक्री करून खवा माफियांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. राजरोस चाललेला हा भेसळीचा बाजार अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास येत नसेल का? कदाचीत प्रत्येक महिन्याला माफियांकडून संबंधीत अधिकार्‍यांचे हात ओले होत असल्यामुळे त्यांच्याकडून हा प्रकार नजरेआड केला जात असावा का? असाही प्रश्नउपस्थित केला जात आहे.

…म्हणून बिबट्याने अन्नाविना घालवला पाण्यावरच दिवस

या शहरात भेसळयुक्त खव्याची चलती

राज्यात औरंगाबाद, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, लातूर, पुणे, मुंबई, बारामती, अहमदनगर, नाशिक, शिर्डी या प्रमुख शहरांसह बाहेरच्या राज्यातील विजापूर, हैदराबाद, गुलबर्गा या ठिकाणच्या मिठाई विक्रेत्यांना मराठवाड्यातील येरमाळा, सरमकूंडी फाटा, नांदूरघाट, धारूर, चौसाळा, भूम व केज येथे दुधापासून तयार केलेल्या खव्याचे वितरण केले जाते. येथील सर्वात मोठी व महत्त्वाची खव्याची बाजारपेठ येरमाळा व सरमकूंडी फाटा येथे आहे. या दोन ठिकाणाहून दररोज नऊ ते दहा हजार टन खवा वितरित केला जातो.

रेल्वेच्या आशिर्वादाने अनधिकृत स्टॉल्स

का होतेय भेसळ?

गेल्या दीड वर्षापासून असलेले कोरोनाचे संकट, पशुखाद्यात झालेली मोठी वाढ व नुकताच बसलेला पावसाचा फटका. यामुळे अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील दुग्ध उत्पादन कमी केले. तसेच व्यवसायातील स्पर्धेमुळे खासगी डेअर्‍यांनी मोठी दरवाढ करून दूध खरेदी केली. परिणामी खवा भट्टीकडे येणार्‍या दूग्ध उत्पादक शेतकर्‍यांची संख्या कमी झाली. तयार होणार्‍या उत्पादनाच्या तुलनेत तेजीमध्ये असलेल्या मालाचा पुरवठा कमी पडू लागला. त्यामुळे आता या पट्ट्यातील काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे व्यापारी सोडता सर्वांनीच सांगली व कर्नाटकातील जमखंडी येथून येणार्‍या चांगल्या दर्जाच्या खव्यात भेसळ करून विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

सात ते आठ हजार टन खवा या परिसरातून आणून चांगल्या दर्जाच्या खव्याच्या नावाने विक्री केला जातो आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबतची माहिती देण्यात आल्याचे काही नागरिक सांगतात; मात्र त्यांच्याकडूनही या बनावट खवा विक्रीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे माफियांनी भेसळयुक्त खवा विक्रीचा सपाटाच लावला आहे. बनावट खवा विक्रीला वेळीच आवर न घातल्यास याचे नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतील. तेव्हा आता ग्राहकांनी जागृत होण्याची वेळ आली आहे. बाजारपेठेत सध्या उपलब्ध असलेल्या सर्व मिठाई प्रकारात अशा बनावट खव्यापासूनच तयार केलेल्या मिठाईची राजरोस विक्री सुरू आहे.

अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीचा छापा

सांगली भेसळीचे, तर मराठवाडा विक्रीचे हब

मराठवाड्यातील प्रमुख खवा उत्पादक केंद्रांना बनावट खव्याचा पुरवठा सांगली व कर्नाटकातील जमखंडी येथून होतो. निकृष्ट दर्जाच्या दूध पावडरचा वापर करून हा खवा तयार केला जातो. साधारण 160 रुपयांपासून 180 रुपयांपर्यंत ही दूध पावडर प्रतिकिलो मिळते. एक किलो दूध पावडरपासून साधारण दोन किलो खवा तयार केला जातो. त्यामध्ये पाणी व वनस्पती तुपाचा वापर केला जातो. नियमानुसार अशा पद्धतीने खवा तयार करण्यास कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. तरीदेखील हा खवा तयार करून राज्यात वितरीत केला जातो आहे.

कोल्हापूर मनपात आता ९२ सदस्य

पुण्यातील बुधवार पेठेत आवक

सांगलीचा हा खवा पुण्यात बुधवार पेठेत येतो. तेथून तो संपूर्ण शहरासह जिल्ह्यात वितरीत होतो. सणासुदीच्या काळात याची मोठी विक्री येथून केली जाते. खरेदीची किंमत कमी असल्यामुळे मिठाईवाले पेढे तयार करण्यासाठी या खव्याचा वापर करतात. शेवटी आर्थिक तुंबड्या भरण्याच्या नादात हे माफिया नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत.

परमबीर सिंग विरुद्ध मुंबई गुन्हे शाखा न्यायालयात

‘‘काही व्यापारी आजही चांगल्या दर्जाच्या खव्याचा व्यवसाय करतात. मात्र मागील दोन वर्षापासून भेसळयुक्त खव्याच आवक वाढल्याने प्रमाणिकपणे व्यवसाय करणारे व्यापारी व स्थानिक शेतकर्‍यांच्या दूग्ध व्यवसायावर परिणाम होतो आहे. हा प्रकार वेळीच थांबला तर येथील व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येतील.’’
– शशिकांत हाके ( व्यापारी सरमकुंडी फाटा )

‘‘मराठवाड्यातील खव्याला मोठी मागणी आहे. मागणी वाढल्याने भाव देखील चांगला मिळाला असता, मात्र भेसळयुक्त खव्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत आमच्या चांगल्या दर्जाच्या खव्याच्या दरावर परिणाम होतो आहे. कमी दरात भेसळयुक्त खवा मिळत असल्यामुळे मिठाईवाले देखील तोच खवा खरेदी करतात.’’
– आर.एम. जाधवर (खवा व्यवसायिक)

Back to top button