सहकार विभागांतर्गत गतिमान सेवा द्या ; अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या सूचना

सहकार विभागांतर्गत गतिमान सेवा द्या ; अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या सहकार विभागांतर्गत येणार्‍या सर्व विभागांच्या योजना, त्यांचे कार्य आणि सेवांची माहिती ऑनलाइन पद्धतीने देण्यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तत्काळ तयार करा, त्यातून ऑनलाइनद्वारे शेतकरी आणि नागरिकांना गतिमान सेवासुविधा देण्यावर भर देण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी येथे दिल्या. सहकार विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (दि. 7) साखर संकुल येथील सभागृहात सर्व विभागांची एकत्रित आढावा बैठक घेतली. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पगुच्छ देऊन राजेश कुमार यांचे स्वागत केले.

या वेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, पणन संचालक शैलेश कोतमिरे, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, महाराष्ट्र राज्य सहकार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राजेश कुमार म्हणाले की, शेतकरी आणि नागरिकांना गतिमान सेवासुविधा द्यायच्या असतील, तर संगणकीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी व्यवसाय सुलभता आणून नागरिकांना ऑनलाइनद्वारे लाभ घेता यावा, यादृष्टीने सहकार विभागाच्या सर्व विभागांचे एकत्रित पोर्टल तातडीने विकसित करण्यात यावे. त्यामध्ये सहकार आयुक्तालय, साखर आयुक्तालय, पणन संचालनालय, राज्य वखार महामंडळ, राज्य सहकार विकास महामंडळ, राज्य कृषी पणन मंडळ, अशा सर्व कार्यालयांमार्फत चालणारे काम एकाच पोर्टलवर उपलब्ध होण्यासाठी तीन महिन्यांत पोर्टलचे काम पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news